
धुळे प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यात पोलीस दलातील प्रतिष्ठेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पहिले लग्न असतानाच परधर्मीय तरुणीचं खोटं धर्मांतर करून दुसरे लग्न केल्याप्रकरणी आझाद नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी शाकिब कलीम शेख याला थेट सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. जिल्ह्यात अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई असून, जलद चौकशी करून झालेल्या या कठोर निर्णयामुळे संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
शाकिब शेख याने ५ नोव्हेंबर २०२३ रोजी रश्मीन शेख हिच्याशी पहिला विवाह केला होता. त्यांना एक अपत्यही आहे. मात्र, कायद्याची पूर्ण जाण असूनही त्याने परधर्मीय तरुणीचं खोटं धर्मांतर करून तिचं नाव ‘माही शाकिब शेख’ ठेवले आणि १ जानेवारी २०२५ रोजी मुस्लिम पद्धतीने दुसरा विवाह केला. ही बाब उघड होताच, १४ जानेवारी २०२५ रोजी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात शाकिबसोबतच त्याचे आई-वडीलही आरोपी ठरले.
६ जानेवारी २०२५ रोजी प्राथमिक चौकशी, फेब्रुवारी २०२५ मध्ये अटक आणि फक्त सात महिन्यांत संपूर्ण विभागीय चौकशी पूर्ण करून जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी २०२५ च्या ऑगस्टमध्ये त्याला बडतर्फीचा फर्मान सुनावले.
धुळे जिल्ह्यात खोटं धर्मांतर करून विवाह केल्याच्या आरोपावरून पोलीस दलातील पहिला कर्मचारी बडतर्फ झाल्याची ही ऐतिहासिक नोंद ठरली आहे. दुसऱ्या लग्नासाठी खोटं धर्मांतर, पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारे वर्तन आणि कायद्याचा खुला भंग — या तिन्ही कारणांवर अधीक्षकांनी घेतलेली ही कठोर भूमिका सध्या जिल्हाभर चर्चेत आहे.