
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई | वडाळा परिसरातून कार व कारमधील महागडे साहित्य चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला आर. ए. के. मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. जुनेद युनुस शेख उर्फ ‘बंबय्या’ (वय ३५, रा. जुना खार, मुंबई) असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर महाराष्ट्रासह गुजरातमध्ये मिळून तब्बल ७० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.
२६ ते ३० जून २०२५ दरम्यान फिर्यादी संजय पांडुरंग ठोंबरे यांनी त्यांची लाल रंगाची होंडा सिटी कार (MH-03-Z-4625) वडाळ्याच्या सी. जी. एस. क्वार्टर्सजवळ पार्क करून ठेवली होती. याचदरम्यान अज्ञात इसमाने ही कार चोरी केली. या प्रकरणी आर. ए. के. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी तपासात १५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि सांताक्रूझच्या लिंकिंग रोड परिसरात सापळा रचून आरोपीला अटक केली. झडतीदरम्यान त्याच्याकडून पिंपरी-चिंचवडमधील चोरीच्या गुन्ह्यातील ३ मोबाईल जप्त करण्यात आले.
जुनेदने चोरी केलेली हीच कार वापरून पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात आणखी गुन्हे केल्याचे तपासात उघड झाले असून ती कार देखील पोलिसांनी जप्त केली आहे. त्याच्याविरोधात अहमदाबाद, सुरत, वापी, वलसाड, पिंपरी चिंचवड, ठाणे, रायगड, नाशिक, पालघर, मिरा भाईंदर, नवी मुंबई व मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
या कारवाईचे मार्गदर्शन पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त सत्यनारायण चौधरी, अपर आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उपआयुक्त रागसुधा आर., आणि सहाय्यक आयुक्त योगेश गावडे यांनी केले.
ही कामगिरी वपोनि संदीप रणदिवे, पोनि (गुन्हे) संदीप ऐदाळे, सपोनि गोविंद खैरे, महेश मोहिते, सुरेश घार्गे, पोहवा अनिल कोळेकर, काशिनाथ शिवमत, रोशन कांबळे, पोशि समिकांत म्हात्रे, अमित रामसिंग, इत्यादी अधिकाऱ्यांनी केली.