
बारामती प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ मावडी येथे नात्याला काळिमा फासणारी हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. जमिनीच्या वादातून सख्या भावानेच आपल्या 82 वर्षीय मोठ्या भावाचा निर्दयीपणे खून करून मृतदेह बाजरीच्या शेतात पुरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणातील विशेष बाब म्हणजे खून करणारा लहान भाऊ 68 वर्षांचा असून, पोलिसांनी केवळ 24 तासांत आरोपीला गजाआड करत गुन्ह्याचा छडा लावला आहे.
घटनाक्रम
दि. 1 ऑगस्ट रोजी सकाळी मावडी शिवारातील बाजरीच्या शेतात ज्ञानदेव लक्ष्मण भामे (वय 82) यांचा मृतदेह आढळून आला. सुरुवातीला हा मृत्यू नैसर्गिक असल्याचा संशय व्यक्त झाला. मात्र, जेजुरी पोलिसांना काही बाबी संशयास्पद वाटल्याने त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. चौकशीत ज्ञानदेव भामे आणि त्यांचे सख्खे भाऊ चांगदेव भामे (वय 68) यांच्यात शेतीच्या वाटपावरून दीर्घकाळ वाद सुरू असल्याचे समोर आले.
तपासाच्या धाग्याने पोलिसांनी चांगदेव भामे याला ताब्यात घेतले. चौकशीत मोठा भाऊ शेतात जाण्यासाठी रस्ता देत नव्हता आणि वहिवाट अडवून त्रास देत होता, असा दावा चांगदेवने पोलिसांसमोर केला. रागाच्या भरात त्याने भावाला लाथाबुक्क्यांनी व दांडक्याने मारहाण केल्याची कबुली दिली.
वैद्यकीय अहवालातही मृताच्या डोक्यावर मारहाणीचे गंभीर जखमा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत रवानगी दिली आहे.
शेवटच्या टप्प्यातील कटुता
आयुष्याच्या उत्तरार्धात, वयाच्या ऐंशीच्या उंबरठ्यावर असतानाही भावांतील जमीनविषयक वाद इतका टोकाला गेला की एका भावाने दुसऱ्याचे प्राण घेतले. “या वयात असा टोकाचा निर्णय घेऊन काय मिळवले?” असा प्रश्न गावकऱ्यांसह संपूर्ण परिसरात उपस्थित होत आहे.