पुणे प्रतिनिधी
मध्यरात्रीचे काळोखात ती आली… आणि लेकरू हरवलं! पुणे शहरात लहान मुलांना पळवून नेणाऱ्या टोळीने दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. अखेर पोलिसांच्या सतर्कतेमुळे वंडरसिटी परिसरातून अपहरण झालेल्या दोन वर्षांच्या चिमुरडीचा शोध लागला असून, तुळजापूर येथील पाच जणांची भीक मागण्याच्या उद्देशाने अपहरण करणारी टोळी अखेर गजाआड झाली आहे.
अपहरणाची रात्र… झोपेतून मुलगी गायब!
कात्रजमधील वंडरसिटीजवळील झोपड्यांमध्ये राहणाऱ्या धनसिंग हनुमंत काळे या मजुराच्या कुटुंबावर काळाचा घाला कोसळला. चार मुलांपैकी दोन वर्षांच्या जुळ्या मुलींमध्ये एकीचा मध्यरात्री झोपेतून अपहरण करण्यात आला. २५ जुलै रोजी रात्री धनसिंग झोपेत असताना मुलगी गायब झाल्याचे सकाळी त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेतली.
140 सीसीटीव्हींचा मारा!
पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. वंडर सिटी परिसरातील सुरुवातीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुचाकीवर चिमुरडीला घेऊन जात असलेले तिघे दिसले. त्यानंतर पोलिसांनी कात्रज ते पुणे रेल्वे स्थानक या दरम्यानचे तब्बल 140 सीसीटीव्ही फुटेज तपासले. पुणे स्टेशनवरील चित्रफितीत आणखी दोघे आरोपी आढळून आले.
तुळजापूरमध्ये लागला ठावठिकाणा
तपासातून आरोपींची ओळख पटली आणि सर्वजण धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी पथक रवाना केले. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मोकाशी यांच्या नेतृत्वाखाली आणि गुन्हे शाखेच्या सहाय्याने तीन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चिमुरडी सुखरूप सापडली. पुढील चौकशीत उर्वरित दोन आरोपींनाही अटक करण्यात आली.
भीक मागण्यासाठी अपहरण!
अपहरण केवळ भीक मागवण्यासाठी केल्याचे आरोपींनी कबूल केले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे – सुनील सिताराम भोसले (५१), शंकर उजण्या पवार (५०), शालुबाई प्रकाश काळे (४५), गणेश बाबू पवार (३५) आणि मंगल हरफुल काळे (१९) अशी आहेत. सर्वजण मोतीझारा, ता. तुळजापूर, जि. धाराशिव येथील रहिवासी आहेत.
कोठडीत रवानगी
पोलिसांनी पाचही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, २ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि 140 सीसीटीव्हींच्या भक्कम पुराव्यामुळे चिमुरडीचे प्राण वाचले. मात्र, भीक मागण्यासाठी होणारी बालअपहरणांची ही साखळी अधिक धक्कादायक आणि चिंताजनक ठरत आहे.


