
पुणे प्रतिनिधी
पुण्यातील गाजत असलेल्या कथित रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी खळबळ उडाली असून माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांना अटक झाल्यानंतर राजकीय आणि वैयक्तिक पातळीवर हालचालींना वेग आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करत पतीला वाचवण्यासाठी रोहिणी खडसे यांनी आता थेट कायद्याचं शस्त्र उपसण्याचा निर्णय घेतला आहे.
काल पुणे सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी रोहिणी खडसे या स्वतः वकिलीचा कोट चढवून हजर झाल्या होत्या. कायद्याचे शिक्षण घेतलेल्या रोहिणी या स्वतः एक पात्र वकील असून, आपल्या पतीच्या सुटकेसाठी त्यांनी आता थेट कोर्टात उतरण्याचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे.
कोर्टात रोहिणींची ‘वकिली’ हजेरी
प्रांजल खेवलकर यांच्यासह इतर आरोपींची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी खचाखच भरलेल्या न्यायालयात रोहिणी खडसे वकिलांच्या पोशाखात दिसल्या. माध्यमांच्या प्रश्नांना टाळत त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की, “प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. योग्य वेळी माझं मत मांडेन.”
पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी
तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितले की, तपासात ‘राहुल’ नावाचा नवा हुक्का पुरवणारा व्यक्ती समोर आला आहे. त्याचा शोध घ्यायचा असून, अंमली पदार्थ कुठून आले, याची माहिती घेण्यासाठी आरोपींमध्ये एकमेकांकडे बोट दाखवण्याचं सुरू आहे. त्यामुळे पाच पुरुष आरोपींची पोलीस कोठडी वाढवावी, अशी मागणी करण्यात आली. मात्र महिला आरोपींसाठी न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आली.
“खेवलकरांना मुद्दाम अडकवले” – ठोंबरे यांचा दावा
प्रांजल खेवलकर यांच्यावतीने वकील विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तिवाद करताना गंभीर आरोप केले. त्यांनी कोर्टात सांगितले की, “इशा सिंग नावाच्या महिलेच्या पर्समधून रिकाम्या सिगारेट पाकिटात कोकेन सापडलं. हे मुद्दाम प्लांट करण्यात आलं होतं. त्या महिला आरोपींच्या माध्यमातून खेवलकरांना अडकवण्याचा प्रयत्न झालाय. विशेष म्हणजे खेवलकरांनी अंमली पदार्थ सेवन केलेलं नाही, की त्यांच्याकडे कोणताही पदार्थ सापडलेला नाही.”
राजकीय पडसाद शक्य
खडसे कुटुंबीयांचं हे प्रकरण राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय बनलं आहे. पूर्वी राज्याच्या सत्ताकेंद्रात असलेले एकनाथ खडसे यांचं नातं असलेले खेवलकर हे अशा गुन्ह्यांमध्ये अडकले गेल्याने अनेक संशय उपस्थित होत आहेत. आता त्यांच्या सुटकेसाठी रोहिणी खडसे स्वतः मैदानात उतरल्यानं याला नवा राजकीय रंग चढण्याची शक्यता आहे.