
करमाळा प्रतिनिधी
“एकदा जिंकल्यावर वाटलं होतं, पुन्हा जिंकू… पण शेवटी सर्व काही हरवलं!” – हे शब्द आहेत सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील २६ वर्षीय जय जाधव याचे, जो आज ८० लाखांच्या कर्जात बुडालाय, फक्त एका ऑनलाइन रमी गेममुळे.
एकेक करत हरवत गेला आयुष्याचा डाव – दीड एकर शेती गेली, स्कॉर्पिओ गाडी गेली, रिअल इस्टेटमध्ये गुंतवलेले २३ लाख बुडाले, मित्रांकडून घेतलेले २० लाखही पार गेले. आज तो खचलेला आहे, पण दुसऱ्यांना चेतावणी देतोय – “मंत्र्यांचा व्हिडीओ पाहून चुकीची प्रेरणा घेऊ नका. मी पुरेसा उध्वस्त झालो आहे, आता इतरांनी तरी सावध राहावं!”
मंत्री ‘ऑनलाइन’ खेळात, तरुणांच्या आयुष्याशी खेळ?
ऑनलाइन रमी, पोकर, बेटिंगच्या विळख्यात आज शहरांपासून ते गावापर्यंतचा तरुण अडकतोय. पुणे, ठाणे, औरंगाबादपासून आताच ग्रामीण महाराष्ट्रही यात सापडतोय. गेल्या दोन वर्षांत वाढलेली कर्जबाजारीपणाची प्रकरणं, कौटुंबिक भांडणं आणि आत्महत्या – हे आकडे धोक्याची घंटा ठरायला हवेत.
आणि अशातच राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. सोशल मीडियावर त्यावर टीकेचा सूर चढताना, लोकप्रतिनिधींच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. “जे हातात कायदे करतात, तेच हात रमीच्या चिपवर का?” असा संतप्त सवाल विचारला जातोय.
फडणवीसांचं आश्वासन, पण कृती कुठं?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे चिंता व्यक्त केल्याचं सांगितलं, पण आतापर्यंत एकाही तरुणाचं आयुष्य परत मिळालं नाही. शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत सांगितलेली घटना अंगावर शहारा आणते – “जमीन, घर गेलं, कर्ज डोक्यावर चढलं… अखेरीस संपूर्ण कुटुंबानं आत्महत्या केली!”
सरकार जागं होणार तरी कधी?
ऑनलाइन गेमिंगच्या या आहारी जाणाऱ्या तरुणांसाठी राज्य सरकारनं आता तातडीची उपाययोजना करावी, हीच अपेक्षा.
कठोर कायदा हवेच!
सेलिब्रिटींच्या जाहिरातींवर बंदी हवीच!
जनजागृती मोहीम, मानसिक आरोग्य केंद्रांची गरज आहेच!
जय जाधवच्या व्यथा सांगतात – “गेम थांबतो, पण कर्ज थांबत नाही.”
म्हणूनच आता वेळ आली आहे क्लिकवर नाही, कृतीवर विश्वास ठेवायची. राज्य सरकारने आणि समाजाने एकत्र येऊन हा डिजिटल जुगार बंद करायला हवा… कारण उद्याचा जय कोण, हे आपल्याला माहीत नाही!