
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केलं असून राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने कहर सुरू केला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या इशाऱ्यानुसार, येत्या २५ आणि २६ जुलैला काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता असून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि गडचिरोली या सात जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यभरातल्या घाटमाथ्यांपासून ते कोकण किनारपट्टीपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हे हवामान पोषक ठरत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
कोकणात उंच लाटांचा धोका, मच्छीमारांना सतर्कतेचा सल्ला
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांत पुढील ४८ तास पावसाचा जोर कायम राहणार असून समुद्रात ३.८ ते ४.७ मीटर उंच लाटा येण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा करण्यात आला आहे. लहान होड्यांनाही पुढील आदेश मिळेपर्यंत समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
विदर्भात पावसाचा हाहाकार; दोन जिल्ह्यांत शाळा-कोलेज बंद
चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यांत मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून आजही हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांतील सर्व शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
विदर्भातील इतर जिल्ह्यांपैकी गडचिरोली, नागपूर, गोंदिया आणि वर्धा याठिकाणीही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः गडचिरोली जिल्ह्यात विजांचा कडकडाट, पूरस्थिती आणि अतिवृष्टीचा धोका असल्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
नद्यांच्या पाणीपातळीत वाढीचा अंदाज
वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, इंद्रावती आणि गोदावरी या नद्यांच्या उपखोऱ्यांत पावसाचा मोठा मारा होण्याची शक्यता असून पूरस्थिती उद्भवू शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
रेड अलर्ट जिल्हे:
रायगड
• रत्नागिरी
• सिंधुदुर्ग
• पुणे घाट
• सातारा घाट
• कोल्हापूर घाट
• गडचिरोली
शाळा-कॉलेज बंद असलेले जिल्हे:
• चंद्रपूर
• भंडारा
राज्य प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि स्थानिक पातळीवरील यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षित स्थळी राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.