
कलबुर्गी वृत्तसंस्था
“३० रुपयांची पावभाजी”… ऐकायला साधं वाटतं, पण याच पावभाजीच्या बिलाने पोलिसांना ३ कोटींच्या दरोड्याचा छडा लावायला मदत केली! कर्नाटकातील कलबुर्गीत घडलेल्या या अजब चोरीच्या प्रकरणाने संपूर्ण पोलीस यंत्रणेलाच हादरवून सोडलं आहे.
११ जुलै रोजी शहराच्या मध्यवस्तीतल्या सोन्याच्या दुकानावर बंदूकधारी टोळीने फिल्मी स्टाईलने धाड टाकली. दुकानमालकाला बांधून ठेवत त्यांनी सुमारे ३ किलो सोने आणि रोकड असा तब्बल ३ कोटींचा ऐवज लंपास केला. पण सर्वात भन्नाट ट्विस्ट मात्र पोलिसांनी उघड केलेला आहे – या गुन्ह्याच्या प्रमुख सूत्रधाराला पावभाजीच्या ३० रुपयांच्या ऑनलाइन पेमेंटमुळे ओळख पटली!
दरोड्याची थरारक कथा…
आरोपी अयोध्या प्रसाद चौहान (४८), फारुक अहमद मलिक (४०) आणि सोहेल शेख उर्फ बादशाह (३०) अशी या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपींची नावे असून, त्यांच्याकडून २.८६५ किलो सोने आणि ४.८० लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. फारुक मूळचा पश्चिम बंगालचा असून, कलबुर्गीत सोन्याचा व्यवसाय करत होता. सोहेल हा मुंबईचा असून टेलर म्हणून काम करतो.
दरोड्याच्या दिवशी आरोपी दुकानात घुसले, मालकाच्या हातपाय दोरीने बांधले आणि दुकानातील लॉकर उघडून मोठ्या शिताफीने सोनं आणि रोख उचलून पसार झाले.
गुप्त सोनं – मालकाचाही संशय
या प्रकरणात आणखी एक वळण तेव्हा आलं, जेव्हा दुकानमालकाने फक्त ८०५ ग्रॅम सोनं चोरी गेल्याचा दावा केला. पण पोलिसांनी जेव्हा आरोपींकडून तब्बल २.८६५ किलो सोनं जप्त केलं, तेव्हा मालकानेही अखेर ३ किलो सोनं चोरीला गेलं असल्याची कबुली दिली. यावरून पोलिसांनी त्यालाही चौकशीच्या घेऱ्यात आणले आहे.
पावभाजीचा ‘बिल’ आणि पोलिसांची कमाल शोधयंत्रणा
या दरोड्याच्या तपासासाठी ५ पथके तयार करण्यात आली होती. गुन्ह्याच्या आधी फारुकने दरोड्याच्या ठिकाणाजवळच फोनपेने ३० रुपये देऊन पावभाजी विकत घेतली होती. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासताना हे लक्षात आलं. त्यानंतर त्या पेमेंटमधून फारुकचा फोन नंबर पोलिसांच्या हाती लागला आणि त्यावरून पुढील साखळी उलगडली.
‘बंदूक’ नव्हे तर लायटर!
दरोड्याच्या वेळी आरोपींनी बंदुकीसारखा दिसणारा लायटर दाखवून घाबरवलं होतं. दरोड्यानंतर आरोपी बसने मुंबईला पोहचले आणि वेगवेगळ्या दिशांनी तिथून पसार झाले. त्यांनी आपले मोबाइल फोन फेकून दिले होते, मात्र पोलिसांनी त्यांच्या मूळ गावात दबा धरला होता. काही सोनं वितळवून विकल्यानंतर आरोपी जेव्हा आपल्या घरी परतले, तेव्हा त्यांना अटक करण्यात आली.
गुन्हेगारीवर ‘डिजिटल’ शिक्का
या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत हुशारीने डिजिटल पुराव्यांचा वापर करून केवळ ३० रुपयांच्या व्यवहारातून ३ कोटींच्या दरोड्याचा पर्दाफाश केला आहे. उर्वरित आरोपी अरबाज आणि साजिद यांचा शोध अद्याप सुरू आहे.
या दरोड्याने एक बाब पुन्हा अधोरेखित केली आहे – गुन्हा कितीही हुशारीने केला असला, तरी डिजिटल जगात एक छोटी चूकही पोलिसांसाठी पुरेसा धागा ठरतो. पावभाजीने पेटवलेली ही केस सध्या संपूर्ण कर्नाटकात चर्चेचा विषय बनली आहे.