
नवी दिल्ली वृत्तसंस्था
2026 हे वर्ष भारतीय संसदीय राजकारणात मोठ्या घडामोडीचं ठरणार आहे. कारण राज्यसभेतील तब्बल 73 सदस्यांचा कार्यकाळ आगामी वर्षभरात संपत आहे. देशभरात आगामी एप्रिल, जून आणि नोव्हेंबर 2026 या महिन्यांत या जागांसाठी निवडणुका पार पडणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातीलही सात बड्या नेत्यांचा समावेश असून, राज्यातील राजकीय गणितात लक्षणीय उलथापालथ होण्याची चिन्हं आहेत.
राष्ट्रपतींकडून चार नावे नामनिर्देशित
राष्ट्रपतींनी नुकतेच राज्यसभेसाठी चार प्रतिष्ठित व्यक्तींना नामनिर्देशित केलं आहे. यामध्ये महाराष्ट्राचे ज्येष्ठ विधिज्ञ आणि विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांचाही समावेश आहे. त्यांनी त्यांच्या यशस्वी कायदाप्रवर्तन कारकिर्दीनंतर संसदेच्या वरिष्ठ सभागृहात प्रवेश केला आहे.
2026 मध्ये कोण होणार निवृत्त?
या निवृत्तीच्या यादीत देशभरातील अनेक दिग्गज नेत्यांची नावं आहेत. त्यामध्ये:
* काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे
* माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा
* भाजपचे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी
* काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह
* माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई
* झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन
*काँग्रेस नेते शक्तीसिंह गोहिल (गुजरात), अभिषेक मनु सिंघवी (तेलंगणा)
* तृणमूल काँग्रेसचे साकेत गोखले
* माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह
* राज्यसभेचे उपसभापती हरिवंश
* लोकसभेचे माजी उपसभापती थंबीदुराई
* डीएमकेचे तिरुची शिवा
महाराष्ट्रातील सात बड्या नेत्यांचा कार्यकाळ संपणार
2 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्रातून राज्यसभेतील सात नेते निवृत्त होणार आहेत. यामध्ये राज्याच्या राजकारणाला दिशा देणाऱ्या अनेक मातब्बर नेत्यांचा समावेश आहे:
* शरद पवार – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद गट) अध्यक्ष
* रामदास आठवले – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री
* भागवत कराड – भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री
* प्रियांका चतुर्वेदी – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
* रजनी पाटील – काँग्रेस
* धैर्यशील माने पाटील – भाजप
* फौजिया खान – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद गट)
राजकीय समीकरणांवर होणार परिणाम
या निवृत्त्यांमुळे राज्यसभेत भाजप, काँग्रेस, एनसीपी आणि शिवसेनेचं प्रतिनिधित्व कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे आगामी निवडणुकीत या जागांवर कोणाची वर्णी लागते, यावर राज्याच्या आणि केंद्राच्या सत्तासमीकरणांचा ताळमेळ अवलंबून असेल.
2026 ची राज्यसभा निवडणूक म्हणजे अनेक दिग्गजांच्या राजकीय प्रवासाचा टप्पा, तर काही नव्या चेहऱ्यांच्या उदयाची संधी ठरणार आहे. विशेषतः महाराष्ट्रातील जागांबाबत सर्वच पक्षांकडून डावपेच आखले जात आहेत, आणि पुढील वर्षभर राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग येणार हे नक्की!