
नवी दिल्ली वृत्तसंस्था
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत असून, लवकरच त्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जुलै २०२५ पासून महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. सध्या ५५ टक्के असलेला DA वाढून ५८ टक्क्यांवर जाणार आहे.
जुलैपासून ही वाढ लागू होईल, मात्र याबाबतची अधिकृत घोषणा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर २०२५ मध्ये होण्याची शक्यता आहे. नेहमीप्रमाणे, सरकार दरवर्षी दोनदा — जानेवारी व जुलैमध्ये — DA वाढवते. जानेवारीतील वाढ मार्चमध्ये लागू केली जाते, तर जुलैतील वाढ सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपासून लागू होते.
महागाई भत्ता कसा ठरतो?
महागाई भत्त्याची गणना ‘अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक – औद्योगिक कामगार’ (AICPI-IW) या निर्देशांकाच्या आधारे केली जाते. मार्च २०२५ मध्ये AICPI निर्देशांक १४३ होता, जो एप्रिलपर्यंत १४४ वर पोहोचला आहे. जर निर्देशांकात ही वाढ सुरूच राहिली, तर DA मध्ये ३ टक्के वाढ निश्चित मानली जात आहे.
६० टक्क्यांपर्यंत जाणार DA!
सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर DA मध्ये सातत्याने वाढ होत आहे. जुलै २०२५ मध्ये ३ टक्के वाढ झाल्यास, जानेवारी २०२६ मध्ये पुन्हा २ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे महागाई भत्ता ६० टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो.
आठवा वेतन आयोग लागू होण्याच्या तयारीत सरकार
केंद्र सरकार आता आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी तयारी करत आहे. हा आयोग जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची शक्यता आहे. या वेळी मूळ पगार व महागाई भत्ता एकत्र करून नवीन वेतनरचना जाहीर केली जाऊ शकते. या निर्णयामुळे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते.