
अकोला प्रतिनिधी
अकोल्यातून एक धक्कादायक व मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. शहरातील ख्यातनाम मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी आपल्या राहत्या घरी विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. न्यू तापडिया नगरमधील त्यांच्या निवासस्थानी ही हृदयद्रावक घटना घडली. डॉक्टर जावरकर हे अकोल्यातील सुप्रसिद्ध ‘सन्मित्र हॉस्पिटल’मध्ये मानसोपचारतज्ज्ञ म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत होते.
रुग्णांच्या मानसिक आजारांवर समुपदेशन करून त्यांना नवा दिलासा देणारे डॉ. जावरकर यांनीच असा टोकाचा निर्णय घेणं, हे अनेकांना हादरवून टाकणारे ठरत आहे. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
नैतिक आधार देणाऱ्या डॉक्टरनेच टोकाचा निर्णय घेतल्याने शहर हादरलं
सामान्य माणसांच्या तणावग्रस्त जीवनाला सावरण्यासाठी कायम समुपदेशन देणारे, मनोबल वाढवणारे आणि सकारात्मकता देणारे डॉ. जावरकर स्वतःच मानसिक तणावाखाली होते का, हा प्रश्न आता संपूर्ण वैद्यकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार त्यांनी विषारी इंजेक्शन टोचून घेतल्याची बाब समोर आली आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून, आत्महत्येचं नेमकं कारण काय, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.
या घटनेमुळे अकोला शहरासह राज्यातील मानसोपचार व वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. रुग्णांच्या दु:खात सहभागी होणाऱ्या डॉक्टरांनीच अशा प्रकारे जीवन संपवलं, हे अनेकांच्या मनाला चटका लावणारं ठरत आहे.
वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मोठी कारवाई : मनीषा मुसळेवर 720 पानांचं दोषारोपपत्र
दरम्यान, सोलापूरमध्येही एका डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणात मोठी कारवाई झाली आहे. प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणात आरोपी मनीषा मुसळे हिच्याविरोधात सोलापूर पोलिसांनी तब्बल 720 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं आहे.
डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येनंतर तब्बल 59 दिवसांनी ही कारवाई करण्यात आली असून, आरोपी मनीषा मुसळे हिच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा मुसळे ही डॉ. वळसंगकर यांच्या रुग्णालयात प्रशासकीय काम पाहत होती. डिसेंबर 2024 पासून तिच्या कामकाजातील गोंधळ व आर्थिक गैरव्यवहार लक्षात आल्यानंतर डॉ. वळसंगकर यांनी तिचे अधिकार कमी केले होते, त्यानंतर निर्माण झालेल्या तणावातून डॉक्टरांनी आत्महत्येसारखा निर्णय घेतल्याचं दोषारोपपत्रात म्हटलं आहे.
या दोन्ही घटना वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये वाढत असलेल्या मानसिक तणावाचा आणि व्यवस्थात्मक प्रश्नांचा गंभीर इशारा देत आहेत. समाजासाठी दिवसरात्र झटणाऱ्या डॉक्टरांनाही मानसिक आधाराची गरज आहे, याची तीव्र जाणीव या घटनांनी करून दिली आहे.