
नवी मुंबई प्रतिनिधी
पुण्यातील पोर्शे प्रकरणानंतर अवघा महाराष्ट्र हादरलेला असतानाच, तसाच एक धक्कादायक आणि हृदयद्रावक अपघात बुधवारी रात्री नवी मुंबईत घडला. न्यू पनवेल परिसरातील हिरानंदानी पुलावर एका १९ वर्षीय युवतीने भरधाव मर्सिडीजने स्कूटरवरून जात असलेल्या दाम्पत्याला जबर धडक दिली. या भीषण अपघातात रेखा यादव (५०) यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचे पती गोपाल यादव (५४) हे गंभीर जखमी आहेत.
अपघात घडला तेव्हा यादव दाम्पत्य आपल्या स्कूटरवरून घराकडे परतत होते. दरम्यान, इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणारी तिथी सिंग ही बेलापूरहून आपल्या मित्रांची भेट घेऊन माघारी येत होती. रात्री सुमारे ८.४५ च्या सुमारास, तिच्या ताब्यातील मर्सिडीज बेंझ कारने हिरानंदानी पुलावर उतरत्या रस्त्यावरून चाललेल्या स्कूटरला पाठीमागून जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की यादव दाम्पत्य हवेत उडून रस्त्यावर आपटले. यात रेखा यादव यांच्या डोक्याला गंभीर इजा होऊन त्या जागीच प्राणास मुकल्या. तर गोपाल यादव यांच्या पाय, हात आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या असून त्यांच्यावर कामोठेतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रेखा यादव घाटकोपरमधील पंतनगर येथील एका खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून कार्यरत होत्या. आपल्या दिवसभराच्या कामानंतर त्या पतीसोबत स्कूटरवरून पनवेलमधील देवद भागातील घरी परतत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
खारघर पोलिसांनी तिथी सिंग या मुलीला ताब्यात घेत असून तिच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताचे नेमके कारण, वाहनाचा वेग आणि परिस्थिती समजून घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची चौकशी केली जात आहे. प्रत्यक्षदर्शींनीही अपघाताचे भयावह चित्र स्पष्ट केले आहे.
हा अपघात पुन्हा एकदा ‘धनदांडग्यांच्या बेफाम मुलां’च्या बेदरकार वाहनचालना आणि कायद्याचा धाक राहिलेल्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. पुण्याच्या पोर्शे प्रकरणाच्या सावल्या अजून धूसर झाल्या नसताना, नवी मुंबईतील या घटनेने नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे.