
जळगाव प्रतिनिधी
गरिबीच्या ओझ्याखालीही शिक्षणाची ज्योत तेवत ठेवत, कोणताही क्लास न लावता स्वतःच्या हिमतीवर NEET परीक्षेत ४७० गुणांची कमाई करणारी एरंडोल (ता. एरंडोल, जि. जळगाव) येथील तेजश्री किशोर बिऱ्हाडे हिने आपल्या जिद्दीची चमक दाखवली आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून वाट काढत, तिच्या आईच्या कष्टांना यशाचं उत्तर देत तेजश्रीने डॉक्टर होण्याच्या दिशेने एक भक्कम पाऊल टाकलं आहे.
आईच्या मोलमजुरीतून घडलेली यशोगाथा
तेजश्री अवघ्या दहा वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर घराची जबाबदारी एकटी आई आशाबाई बिऱ्हाडे यांच्या खांद्यावर आली. आशाबाईंनी गावात आठ-दहा घरी भांडी घासण्याचं, धुणं धुण्याचं काम करत मुलांचं पोट भरलं आणि शिक्षणासाठी पैसा साठवला. कित्येक वेळा उपासमारीची वेळ आली, पण मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. आईच्या त्याच कष्टांना तेजश्रीने NEETच्या निकालात उजाळा दिला.
कोणताही क्लास नाही, पण तयारी ठाम!
संकटांमध्येही डगमगू न देता तेजश्रीने घरच्या घरीच अभ्यास केला. कोणताही क्लास न लावता केवळ पुस्तकांच्या साथीने तिने NEET परीक्षेची तयारी केली आणि थेट ४७० गुण मिळवत यशाचा डोंगर सर केला. तिचा आत्मविश्वास आणि चिकाटी आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी डॉक्टर होण्याची जिद्द
तेजश्रीच्या वडिलांचं स्वप्न होतं – ‘मुलीने डॉक्टर व्हावं’. वडिलांच्या त्या इच्छेला आकाश ठरवत, तेजश्रीने वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला. बारावीनंतर तिचा इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश झाला होता, पण गोरगरिबांची सेवा करता यावी म्हणून तिने वैद्यकीय शिक्षणाचा मार्ग स्वीकारला. “एमबीबीएस करून डॉक्टर होऊन समाजासाठी काहीतरी करायचं आहे,” असं तेजश्री ठामपणे सांगते.
निकालाच्या दिवशीही आईसोबत भांडी घासत होती तेजश्री NEET चा निकाल लागला त्यावेळी तेजश्री आईसोबत भांडी घासण्यासाठी गेली होती. मोबाईलवर निकाल पाहताच घरात आनंदाचं वादळ उसळलं. गावात आणि कुटुंबात सगळीकडे तेजश्रीच्या नावाचा गजर सुरू झाला. विशेष म्हणजे तेजश्रीची मावस बहिण सध्या ठाणे येथे दंतरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत असून, तिची यशोगाथा देखील प्रेरणादायी ठरली आहे.
तेजश्रीसारख्या विद्यार्थिनींच्या यशाने सिद्ध होतं – जिद्द, मेहनत आणि कष्ट यांच्या जोरावर कोणतीही स्वप्नं साकार होऊ शकतात.