
उमेश गायगवळे मो:9769020286
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला असून, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का? याबाबत चर्चेला जोर चढला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून दोन्ही पक्षांत युतीसंदर्भात हालचाली वाढल्या असून, मनसे-उद्धव बाळासाहेब ठाकरे गट युतीच्या शक्यतेची चर्चाचं केंद्रबिंदू ठरली आहे.
राजकीय वर्तुळातल्या चर्चेनुसार, गेल्या महिनाभरापासून ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या हालचाली अंतिम टप्प्यात असून, दोघांमध्ये परदेश दौऱ्याच्या काळात संवाद झाल्याचं बोललं जात आहे. या चर्चांमध्ये युवानेते आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतली असून, यामुळेच पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार, अशा चर्चांना जोर मिळाला आहे.
दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या युतीसंदर्भात सूचक वक्तव्य केल्यानंतर मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर राऊत यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ पुस्तकाचे वाचन करत असल्याचं नमूद केल्याने चर्चेला राजकीय रंग चढला आहे. संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंमध्ये फोनवर चर्चा झाल्याचा दावा करून नव्या चर्चांना अधिक बळ दिलं आहे.
‘संकटमोचक’ भूमिका जुळवाजुळवीची
युतीच्या शक्यतेवर अटी-शर्तींचं सावट आहे. उद्धव ठाकरे गटाने मनसेला महायुतीशी असलेले संबंध तोडण्याची अट घातली होती, तर मनसेने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसशी नातं तोडण्याचा आग्रह धरल्याचं समजतं. काँग्रेसशी असलेल्या संबंधांमुळे उद्धव ठाकरेंना मुस्लिम मतदारांचा पाठिंबा मिळाल्याचं गणित लक्षात घेतलं, तर राज ठाकरे यांच्या अटींमुळे हा मतदार दूर जाऊ शकतो, अशी भीती शिवसेनेला आहे. यामुळेच युतीचा निर्णय काहीसा रखडल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे.
राजकीय नफा-तोट्याचा हिशोब सुरु
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास सर्वच राजकीय पक्षांच्या समीकरणांवर परिणाम होणार हे निश्चित. भाजपसाठी ही युती म्हणजे डोकेदुखी ठरू शकते. कारण एकनाथ शिंदे यांची शिवसेना सध्या महायुतीत सक्रीय असून, ती ठाकरेंच्या युतीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. महायुतीकडे सध्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या इनकमिंगवर या युतीचा परिणाम होऊ शकतो. दुसरीकडे, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा राहील की नाही, याविषयी अनिश्चितता निर्माण झाली आहे.
महापालिकेवर पुन्हा ‘ठाकरे’ छाप?
2006 साली झालेल्या विभाजनानंतर शिवसेनेत झालेली फूट आणि त्यातून निर्माण झालेली राज ठाकरे यांची मनसे, हे सर्व घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणाऱ्या ठरल्या. मुंबई महापालिकेवर दीर्घकाळ सत्ता असलेल्या शिवसेनेला या अंतर्गत मतभेदांचा फटका बसला. मात्र आगामी निवडणुकीत ही ताकद पुन्हा एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज-उद्धव ठाकरे युती झाल्यास, ठाकरेंचं पुन्हा महापालिकेवर वर्चस्व निर्माण होण्याची शक्यता प्रबळ आहे. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या तरुण नेतृत्वामुळे ही युती नव्या स्वरूपात साकार होऊ शकते. त्यामुळेच महापालिका निवडणूक ही महायुतीसाठी मोठं आव्हान ठरू शकते.
शिंदेंच्या प्रभावाची खरी परीक्षा
येत्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रभावाचीही कसोटी लागणार आहे. महापालिकेतील वर्चस्वासाठी भाजप-शिंदे गट आणि संभाव्य ठाकरे बंधू युती यांच्यात चुरस निर्माण होणार असून, राज्यातील राजकीय सत्तासमीकरणं बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकूणच ठाकरे बंधू एकत्र येणार का? युतीच्या चर्चांना प्रत्यक्ष रूप मिळणार का? आणि या युतीमुळे कोण बाजी मारणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण, महाराष्ट्राचं पुढचं राजकारण या युतीच्या निर्णयावर ठरणार, हे मात्र नक्की!