उमेश गायगवळे मो. 9769020286
“साधना तर गेली, पण एक प्रश्न मागे ठेवून – ‘मला कमी मार्क मिळाले, की माझ्या जन्मदात्याला?'”
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावात ही घटना घडली. साधना ही अत्यंत हुशार मुलगी होती. तिला दहावीमध्ये 90 टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळाले होते आणि ती डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहात होती. यासाठी ती नीटची तयारी करत होती. नीटच्या सराव परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने साधनाचे वडील शिक्षक मुख्याध्यापक असलेले वडील धोंडीराम भोसले. यांनी तिला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली या मारहाणीत ती बेशुद्ध झाली आणि तिचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात घडलेली ही घटना केवळ एका विद्यार्थिनीच्या मृत्यूपर्यंत सीमित नाही. ही घटना आपल्या सगळ्यांच्या शिक्षणव्यवस्थेच्या, पालकत्वाच्या, आणि सामाजिक अपेक्षांच्या पायाभूत ढाच्यावरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. एका मुख्याध्यापक बापाने केवळ अपेक्षित गुण न आल्यामुळे आपल्या मुलीला अमानुषपणे मारहाण केली आणि तिचा जीव घेतला. बापाच्या मनात मुलीपेक्षा तिच्या शिक्षणावर खर्च केलेले पैसे अधिक महत्त्वाचे होते. ही केवळ हत्या नाही – ही विकृती आहे.
NEET किंवा JEE सारख्या परीक्षांची तयारी ही फक्त अभ्यासाची परीक्षा नाही, तर पालकांच्या अपेक्षांचं, समाजाच्या दबावाचं, आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचं युद्ध आहे. अनेक मध्यमवर्गीय पालक आपल्या मुलांकडून अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करून घेण्याच्या आशेने महागडे क्लासेस, शिकवण्या लावतात. त्यांच्या गुंतवणुकीला ‘मार्क्स’च्या स्वरूपात परतावा हवा असतो. पण प्रत्येक मुलं टॉपर नसतात, आणि त्यांची क्षमता, आवड, कल वेगळा असतो, हे समजून घेणं गरजेचं आहे.
आपल्या देशात मुलांचा विचार ‘पेरेंटल कस्टडी’ या मानसिकतेने केला जातो. मुलांच्या आयुष्यातील सर्व निर्णय पालक घेतात – शाळा, विषय, करिअर, सवयी – सगळं. मुलांचं स्वतःचं व्यक्तिमत्त्व, त्यांची मतं, त्यांचे स्वप्नं कुठे हरवून जातात हे कळतही नाही. पालक म्हणून आपली जबाबदारी इतकीच नसते की त्यांना महागडा फोन, बाईक, क्लासेस मिळावा – त्यांना मोकळेपणाने व्यक्त होण्यासाठी ‘मोकळं मन’ देखील हवं असतं. ‘ऐकणारा’ कोणी तरी हवा असतो.
आजचा विद्यार्थी शिक्षण घेत नाही, तो शिक्षण ‘पेलतो’ आहे. सततच्या चाचण्या, स्पर्धा, तुलना, अपयशाची भीती, आणि त्यातून येणारी नैराश्याची लाट – हे सगळं त्यांच्या मनावर खोल प्रभाव टाकतं आहे. कोटा शहरात दरवर्षी होणाऱ्या आत्महत्यांचे आकडे आपण विसरतो का? त्या मागे कारण हेच – अपयश म्हणजे संपूर्ण आयुष्य संपलं – असा चुकीचा समज पसरवला गेला आहे. ही केवळ मुलांची अयशस्वी होण्याची भीती नाही, तर पालकांच्या प्रेम गमावण्याची भीती आहे.
मुलं म्हणजे मार्क्स मिळवणाऱ्या यंत्रणा नाहीत. त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर यश किंवा अपयश ठरवण्याचा अधिकार केवळ परीक्षेला नाही. पालक म्हणून आपली भूमिका मार्गदर्शकाची आहे – दडपण देणाऱ्याची नव्हे. आपल्या अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर इतकं लादू नका की ते श्वास घेणं विसरून जातील. त्यांना आयुष्य जगू द्या, त्यांच्या मार्गावर चालू द्या. कधीकधी नापास झालेली मुलंही ‘इतिहास’ घडवतात – हे लक्षात ठेवायला हवं.
आजच्या शिक्षणव्यवस्थेतही गंभीर प्रश्न आहेत. अभ्यासक्रम कठीण होत चालला आहे, पण शिकवण्याच्या पद्धतीत फारसा बदल नाही. राज्य मंडळ ‘CBSE’चा पॅटर्न राबवण्याच्या प्रयत्नात आहे, पण विद्यार्थी, शिक्षक, आणि पालक या बदलासाठी तयार आहेत का? शाळा ओस पडत आहेत आणि क्लासेस फुलत आहेत – याचा अर्थ आपल्या शिक्षणव्यवस्थेचा आत्मा कोठेतरी हरवला आहे.
शाळांमध्ये समुपदेशक असावेत अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे, पण अजूनही फारशा शाळांमध्ये हे साध्य झालेलं नाही. मुलांचे मानसिक ताण, लैंगिक समस्या, व्यसनांचं आकर्षण, वाढता स्क्रीन टाईम – या सगळ्याची काळजी घेणं ही केवळ शिक्षकांची जबाबदारी नाही, ती समाजाची आहे – विशेषतः पालकांची.
पालक म्हणून आपली मुलं आपल्यावर विश्वास ठेवून त्यांच्या भावना सांगतील अशी जागा निर्माण करणं आवश्यक आहे. त्यांचं जगणं समजून घेणं गरजेचं आहे. फक्त रिझल्टच्या दिवशी केक कापून अपयशाचाही उत्सव साजरा करायला लागतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण ‘पालक’ होतो. आपल्या अपेक्षांची व्याख्या आपल्याच मर्यादांपुरती न ठेवता, मुलांच्या स्वप्नांशी जोडणं – हीच आजची गरज आहे.
अशा घटनांतून आपण शिकत नाही तर आणखी कोणी मुलं गमवावी लागतील. मुलांनी टॉपर होणं ही गरज नाही, त्यांनी जिवंत राहणं आणि आनंदी असणं ही खरी गरज आहे. अपेक्षा ठेवा, पण त्या इतक्याच असोत की मुलांचं मन मोडू नये…


