
मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे मुख्य बांधकाम नियोजित कालावधीत पूर्ण झाले आहे. आता वाहतुकीच्या अनुषंगाने मार्ग रेषा आखणी, वाहतूक बेट, वाहतूक दिवे उभारणी कामे प्रगतिपथावर असून ती येत्या दोन दिवसात पूर्ण होत आहेत.
पालिकेच्या पूल विभागाच्या समन्वयाने विक्रोळी पुलाची उभारणी, स्थापत्य कामे ३१ मे च्या आधी पूर्ण झाली असून पूर्व उपनगरातील विक्रोळी येथील रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या उड्डाणपुलामुळे पूर्व – पश्चिम बाजू जोडली जाणार आहे.
या पुलामुळे विक्रोळी पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि पूर्व परिसरातील पूर्व द्रुतगती महामार्ग जोडले जाणार आहेत. प्रवास वेळेत सुमारे ३० मिनिटांची बचत होणार आहे. वाहतूक पोलिसांसमवेत समन्वय साधून लवकरच विक्रोळी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनातर्फे देण्यात येत आहे.
पुलाचे वैशिष्ट्ये
विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर उभारण्यात आलेल्या पुलाची एकूण रुंदी १२ मीटर तर लांबी ६१५ मीटर इतकी आहे. त्यापैकी ५६५ मीटरची उभारणी पालिकेने केली आहे. तसेच उर्वरित ५० मीटर लांबीपर्यंतची उभारणी मध्ये रेल्वेकडून करण्यात आली आहे.
तीन टप्प्यांत १८ तुळया
रेल्वे विभागाकडून एकूण ७ तुळया स्थापित करण्यात आल्या असून त्यांचे एकूण वजन ६५५ टन आहे. या पुलावर महानगरपालिकेने टाकलेल्या तुळया सुमारे २१४२ टन इतक्या वजनाच्या आहेत. तसेच या तुळयांची लांबी २५ ते ३० मीटर इतकी आहे. पुलाच्या तीन टप्प्यांत एकूण १८ तुळया टाकण्यात आल्या आहेत.
येत्या दोन दिवसात उरलेली कामे म्हणजे एका बाजूकडील ध्वनिरोधक, रंगकाम आणि पश्चिमेकडील बाजूवर मार्ग रेषा आखणी आदी कामे पूर्ण करण्यात येणार आहे. रस्ते आणि वाहतूक विभागाने पश्चिमेकडील बाजूवर वाहतूक थांबा क्षेत्र तयार केले आहे.
सध्या वाहतूक बेट उभारण्यात येत आहे. सिग्नल बसवायचे काम सुरू आहे. वाहतूक पोलिसांसमवेत समन्वय साधून लवकरच विक्रोळी पूल वाहतुकीस खुला करण्यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनाने कळविले आहे.