
मुंबई प्रतिनिधी
मुंबई : महापालिकेने 2024-25च्या अर्थसंकल्पात तब्बल सात हजार कोटी रुपयांची तरतूद आरोग्य विभागासाठी केली असतानाही मुंबईतील पालिका रुग्णालयांमध्ये रुग्णांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. “महापालिकेचा पैसा नेमका जातो कुठे?” असा थेट सवाल मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.
खासदार गायकवाड यांनी शनिवारी वांद्रे येथील के. बी. भाभा रुग्णालयाला भेट देत तेथील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रुग्णालयातील असुविधांवर ताशेरे ओढले. “के. बी. भाभा रुग्णालयाचे कॅथलॅब, नेफ्रोलॉजी, न्यूरोलॉजी, कार्डियाक केअर आणि ब्लड बँक यांसारख्या सुविधा कार्यान्वित केल्याशिवाय रुग्णालयाचे उद्घाटन होणार नाही, अशी ग्वाही महापालिकेने दिली होती. मात्र, आजपर्यंत त्या सुविधा सुरू झालेल्या नाहीत,” असे गायकवाड यांनी सांगितले.
“रुग्णालयात पुरेसे डॉक्टर नाहीत, औषधांचा प्रचंड तुटवडा आहे. मधुमेह आणि रक्तदाबाच्या औषधांसाठी रुग्णांची अक्षरशः फरफट होते. यावर्षी औषधांसाठीची तरतूद मागील वर्षीच्या तुलनेत निम्म्यावर आणून केवळ सहा कोटी रुपये केली आहे. त्यातही गेल्या 14 महिन्यांत औषधांच्या निविदा काढण्यात आलेल्या नाहीत,” अशी टीकाही त्यांनी केली.
सीटी स्कॅन, एमआरआयचा अभाव, रुग्णांना खिशाला चाट
उपनगरातील पालिका रुग्णालयांमध्ये ‘सीटी स्कॅन’, ‘एमआरआय’सारख्या अत्यावश्यक तपासण्या करता येत नाहीत. त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करावा लागतो, हे गंभीर आहे, असेही गायकवाड यांनी नमूद केले.
मिठी नदीची सफाई अपूर्ण, पूरस्थितीची भीती कायम
खासदार गायकवाड यांनी त्याच दिवशी मिठी नदीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी महापालिका आणि राज्य सरकारवरही हल्लाबोल केला. “महापालिका आयुक्तांनीच मान्य केले आहे की, मिठी नदीची सफाई केवळ 55 टक्के पूर्ण झाली आहे. संपूर्ण मुंबईत नाल्यांची सफाई 68 टक्क्यांपर्यंतच झाली आहे. अशा स्थितीत येणाऱ्या पावसाळ्यात मुंबईकरांना पूरस्थितीला सामोरे जावे लागेल, यात शंका नाही,” असे गायकवाड म्हणाल्या.
‘तुंबई’ करणाऱ्यांवर कारवाई कधी?
मिठी आणि नाल्यांच्या सफाईसंदर्भात हलगर्जीपणा दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारांवर कारवाई होणार की नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. “सरकार आणि पालिकेच्या बेजबाबदारपणाचा भोग नागरिकांना भोगावा लागत आहे. मग जबाबदारी घेणारे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार कधी?” असा रोखठोक सवाल गायकवाड यांनी केला.