मुंबई प्रतिनिधी
राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने सोलापूरच्या नेत्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसमधून राजकारणाची सुरुवात करून अवघ्या तीन वर्षांत राज्यसभेपर्यंत मजल मारणाऱ्या वाघमारे यांच्या निवडीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
राज्यसभेच्या सात जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून विनोद तावडे, रामराव वाडकुटे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि माया इनव्हते यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर शिवसेनेकडून प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांची नावे चर्चेत असताना, नवख्या चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतल्याने अनेकांचे अंदाज चुकले.
काँग्रेसमधून शिवसेनेकडे प्रवास
प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षातून केली. सोलापूर शहर काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी सुमारे दीड वर्ष सांभाळली होती.
एप्रिल २०२३ मध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर अल्पावधीतच त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी, आक्रमक वक्तृत्व आणि राजकीय मुद्द्यांवरील स्पष्ट भूमिकेमुळे पक्षनेतृत्वाचा विश्वास संपादन केला.
शिवसेनेने त्यांच्यावर राज्य प्रवक्त्या तसेच धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख अशी महत्त्वाची जबाबदारी सोपवली. विविध चर्चासत्रे, माध्यमांमधील चर्चांमध्ये आणि शिवसेनेच्या दसरा मेळाव्यांमधील भाषणांमुळे त्या पक्षाचा आक्रमक चेहरा म्हणून पुढे आल्या.
शैक्षणिक आणि बौद्धिक पार्श्वभूमी
प्रा. डॉ. ज्योती वाघमारे या उच्चशिक्षित असून इंग्रजी साहित्यात त्यांनी पीएचडी प्राप्त केली आहे. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
दहावीच्या परीक्षेत ८४ टक्के गुणांसह त्या उत्तीर्ण झाल्या, तर बारावीच्या परीक्षेत पुणे विभागातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. अर्धमागधी या विषयात राज्यात प्रथम येण्याचा मानही त्यांना मिळाला. महिलांच्या प्रश्नांवरील संशोधनासाठी त्यांना राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे.
दहा वर्षांहून अधिक काळ त्यांनी प्राध्यापिका म्हणून अध्यापन केले असून सोलापूरमधील वालचंद महाविद्यालयातही त्यांनी काही काळ सेवा बजावली.
सामाजिक चळवळीतील सक्रियता
प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची ओळख सोलापूरमधील आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्या अशी आहे. त्यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पँथर चळवळीशी संबंधित होते. अत्यंत साध्या परिस्थितीत त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. हॉटेलमध्ये वेटर तसेच बांधकाम मजूर म्हणून काम करत असतानाच त्यांनी सामाजिक चळवळीत सहभाग ठेवला.
सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत नागरिकांनी त्यांना नगरसेवक म्हणून निवडून दिले होते. या पार्श्वभूमीचा प्रभाव प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीवर दिसून येतो.
वाघमारे यांनी मानवी हक्क अभियान, विद्रोही सांस्कृतिक चळवळ तसेच आंबेडकरी आंदोलनातून आपले सार्वजनिक काम सुरू केले. काही काळ त्यांनी वृत्तनिवेदिका म्हणूनही काम केले. पुढे उच्चशिक्षणाचा उपयोग सामाजिक जनजागृतीसाठी व्हावा या उद्देशाने त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात व्याख्यानांच्या माध्यमातून जनजागृती केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांच्या जीवन आणि विचारांवर त्यांनी अनेक व्याख्याने दिली आहेत.
बहुभाषिक वक्त्या
मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू आणि कन्नड या पाच भाषांवर त्यांचे प्रभुत्व असल्याचे सांगितले जाते. यामुळे विविध व्यासपीठांवर प्रभावीपणे मांडणी करण्याची त्यांची शैली लक्षवेधी ठरली आहे.
शिवसेनेतील आक्रमक प्रवक्त्या
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर वाघमारे यांनी पक्षाच्या बाजूने आक्रमक आणि सडेतोड भूमिका मांडत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. राज्याच्या राजकारणावर, संविधानावर तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित भाषणांमुळे त्या चर्चेत राहिल्या.
पक्षाच्या दसरा मेळाव्यांमध्ये त्यांनी विरोधकांवर टीका करत शिवसेनेची भूमिका ठामपणे मांडली. त्यामुळे पक्षाच्या संघटनात्मक विस्तारात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे मानले जाते.
पश्चिम महाराष्ट्रात पक्षविस्ताराची अपेक्षा
सोलापूरसारख्या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातून आलेला आणि आंबेडकरी चळवळीशी जोडलेला चेहरा राज्यसभेत गेल्यास त्या भागात शिवसेनेचा विस्तार करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा पक्षात व्यक्त केली जात आहे.
अल्पावधीत राजकीय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करत राज्यसभेपर्यंत पोहोचलेल्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


