
मुंबई प्रतिनिधी
जनतेच्या आरोग्याच्या हक्कासाठी उभारलेले देवनार येथील मंँटरनीटी रुग्णालय सध्या केवळ नावालाच उरले आहे. एकेकाळी आशेचा किरण ठरलेले हे रुग्णालय सध्या गंभीर सुविधांच्या अभावामुळे अक्षरशः मरणासन्न अवस्थेत आहे. डॉक्टर नाहीत, उपकरणे नाहीत, औषधे नाहीत, फक्त गोंधळ आणि बेपर्वाई.
सत्तरच्या दशकात उभारण्यात आलेल्या या रुग्णालयाला पुनरुज्जीवन देण्यासाठी सरकारने 45 खाटांचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारले. मात्र, प्रत्यक्षात 181 पदांपैकी केवळ 74 पदेच भरलेली आहेत. उर्वरित पदे रिक्त असून त्यामुळे रुग्णसेवा ठप्प झाली आहे.
विभागातील नागरिकांना मोठ्या अपेक्षेने येथे उपचारासाठी यावे लागते, पण त्यांना निराश होऊन माघारी जावे लागते.
खासगीकरणाच्या नावाखाली आरोग्य व्यवस्थेचा खेळखंडोबा सुरू असल्याची टीका स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (PPP) च्या माध्यमातून रुग्णालय खासगी संस्थेला चालविण्यास दिले आहे, मात्र प्रत्यक्षात सेवा देण्यात टाळाटाळ होत आहे. 42 टक्के निधी खर्च न झाल्याचेही समोर आले आहे.
सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा देण्याचे सरकारचे वचन हे केवळ घोषणांपुरतेच राहिले आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. देवनार रुग्णालयाचा मुद्दा हा केवळ एका भागापुरता मर्यादित नसून संपूर्ण आरोग्य व्यवस्थेतील अपयशाचे प्रतीक बनला आहे.
“सरकारने तात्काळ लक्ष घालावे, रिक्त पदे भरावीत व रुग्णालयाच्या कार्यक्षमतेत सुधारणा करावी,” अशी जोरदार मागणी नागरिक आणि भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष यांच्या कार्यकर्त्यांनकडून केली जात आहे.