
नागपूर प्रतिनिधी
नागपूरच्या सुनीता गटलेवार (वय ४३) या महिलेला पाकिस्तानात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी अखेर अटक करण्यात आली आहे. गुरुवारी पहाटे अडीच वाजता नागपूरमधील दंडाधिकारी न्यायालयात या प्रकरणावर तातडीची सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूंनी युक्तिवाद मांडल्यानंतर न्यायाधीशांनी पोलिसांना तात्काळ अटकेचे आदेश दिले.
सुनीता गटलेवार या ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान एका ख्रिश्चन धर्मगुरूला भेटण्यासाठी कायद्याचे उल्लंघन करून पाकिस्तानात गेल्या होत्या. त्यांची पाकिस्तानातील उपस्थिती आणि एका धर्मगुरूसोबतचा सततचा मोबाईल संवाद याची माहिती अटकेनंतर समोर आली आहे. या प्रकारामुळे सुरक्षा विषयक चिंतेला तोंड फुटले आहे.
विशेष म्हणजे, भारतीय कायद्यानुसार महिलेला रात्री अटक करता येत नाही, त्यामुळे सूर्योदयापूर्वीच, पहाटेच पोलिसांनी सुनीता गटलेवार यांना ताब्यात घेतलं. अटकेनंतर त्यांना थेट न्यायाधीशांच्या निवासस्थानी नेऊन सुनावणीसाठी हजर करण्यात आलं.
सुनीता गटलेवार यांनी पाकिस्तानात जाण्यापूर्वी आपल्या १२ वर्षांच्या मुलाला कारगिलमधील एका हॉटेलमध्ये सोडले होते. हा मुलगा सध्या कारगिलच्या बालकल्याण समितीच्या ताब्यात होता. समितीने संबंधित कुटुंबीयांशी संपर्क साधून मुलाला त्यांच्या ताब्यात सुपूर्द केलं आहे.
या प्रकारामुळे सुरक्षा यंत्रणा आणि समाजामध्ये खळबळ उडाली असून, सुनीता गटलेवार यांच्याविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.