पुणे प्रतिनिधी
पुणे| शहरातील ससून रुग्णालयात बॉम्ब असल्याचा खोटा मेसेज पाठवून खळबळ उडवणाऱ्या व्यक्तीस बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव अरविंद कृष्णा कोकणी (वय २९) असे असून, तो ससून रुग्णालयातच सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता.
१२ मे रोजी ससूनमधील एका डॉक्टरच्या मोबाईलवर बॉम्ब असल्याचा मेसेज आल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकारानंतर बंडगार्डन पोलिसांनी बीडीडीएस पथकासह संपूर्ण रुग्णालयाची तपासणी केली. मात्र, कोणताही संशयास्पद पदार्थ सापडला नाही.
तपासात धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. आरोपीने रुग्णालयातील एका महिला रुग्णाचा मोबाईल चोरून त्या मोबाईलवरूनच डॉक्टरला धमकीचा मेसेज पाठवला होता. यानंतर त्याने मोबाईल बंद केला. दुसऱ्या दिवशी मोबाईल पुन्हा ऑन करून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना देखील धमकीचा मेसेज पाठवून पुन्हा मोबाईल बंद केला.
पोलिसांनी खबऱ्यांमार्फत केलेल्या कसोशीनंतर आरोपीला येरवडा परिसरातून अटक करण्यात आली. सध्या पोलिस त्याने असे कृत्य का केले, याचा तपास करत आहेत. या घटनेमुळे काही वेळेस रुग्णालय परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रुग्णालय प्रशासन आणि पोलिस यंत्रणाही तणावात आल्या होत्या.
या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.


