
पुणे प्रतिनिधी
पुणे शहराजवळील पिंपरी-चिंचवड परिसरात एका १८ वर्षीय तरुणीची भररस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी सपासप वार करून या तरुणीला संपवले.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही खळबळजनक घटना रविवारी, ११ मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. कोमल भरत जाधव (वय १८) असे हत्या झालेल्या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे.
घटनेच्या वेळी कोमल रस्त्यावरून जात असताना, मोटारसायकलवरून आलेल्या दोन तरुणांनी तिच्यावर अचानक हल्ला चढवला. त्यांनी आपल्याजवळील धारदार शस्त्रांनी वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, कोमल रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
हत्या केल्यानंतर दोन्ही मारेकरी तरुण दुचाकीवरून घटनास्थळावरून वेगाने पसार झाले. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे हल्लेखोर कैद झाले आहेत. त्यांनी डोक्याला हेल्मेट घातले होते आणि अंगात काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते, त्यामुळे त्यांची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा कसून शोध घेत आहेत.
कोमलची हत्या नेमकी कोणी आणि कोणत्या कारणातून केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि, प्राथमिक तपासात ही हत्या प्रेम प्रकरणातून झाली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे आणि त्या दृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे.