
सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील बेकरी व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देऊन 25 लाख रुपये खंडणी उकळल्याच्या प्रकरणात बोरगाव पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे.
जानेवारी 2024 ते 12 मे 2025 या कालावधीत नागठाणे आणि बोरगाव परिसरात ही घटना घडली होती.
साहिल शिकलगार, परशुराम ऊर्फ भैय्या रविंद्र मोहिते, अमित ऊर्फ काळया अशोक मोहिते, रोहित संतोष मोहिते आणि अक्षय सर्जेराव मोहिते (सर्व रा. नागठाणे, ता. जि. सातारा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विकास राजेंद्र कोळेकर (रा. बोरगाव) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या घटनेने नागठाणे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास कोळेकर हे बेकरी माल विक्रीचा व्यवसाय करतात आणि दररोज पहाटे तीन वाजल्यापासून नागठाणे व तारळे परिसरात माल वितरणासाठी जातात. या दरम्यान, संशयित आणि कोळेकर यांची रस्त्यात अनेकदा भेट होत होती. जानेवारी 2024 मध्ये, नागठाणे ते सासपडे रस्त्यावर संशयितांनी मोटारसायकलवर येऊन कोळेकर यांच्या वाहनाला अडवले. यावेळी परशुराम ऊर्फ भैय्या मोहिते याने स्वत:ला “नागठाण्याचा भाई” म्हणवत, “इथे व्यवसाय करायचा असेल तर दरमहा 1 ते 1.5 लाख रुपये खंडणी द्यावी लागेल, अन्यथा तुला आणि तुझ्या कुटुंबाला जीवे मारू,” अशी धमकी दिली. जीवाच्या भीतीने कोळेकर यांनी संशयितांना वेळोवेळी पैसे दिले.
परशुराम मोहिते याने “कान्हाभाईसाठी”, “गुन्हे मिटवण्यासाठी”, “गाडीचे कर्ज फेडण्यासाठी” किंवा “बायकोचे मंगळसूत्र सोडवण्यासाठी” अशी खोटी कारणे सांगत सतत धमक्या देऊन सव्वा वर्षात ऑनलाइन 13 लाख रुपये आणि रोख 12 लाख रुपये असे एकूण 25 लाख रुपये उकळले. 11 एप्रिल 2025 पासून पुन्हा पैशाची मागणी सुरू झाल्याने कोळेकर यांनी मोबाइल बंद ठेवला. यामुळे चिडलेल्या संशयितांनी ह्युंदाई आय-20 गाडीतून कोळेकर यांच्या बोरगावातील घर आणि सुदेश बेकरी येथे जाऊन त्यांच्या धाकट्या भावाला धमक्या दिल्या.
या सततच्या त्रासाला कंटाळून आणि जीवाला धोका वाटल्याने कोळेकर यांनी कुटुंबीयांशी सल्लामसलत करून 12 मे 2025 रोजी बोरगाव पोलीस ठाण्यात साहिल शिकलगार, परशुराम मोहिते आणि इतर तिघांविरुद्ध तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन बोरगावचे प्रभारी स.पो.नि. संदीप वाळवेकर यांनी डी.बी. अंमलदारांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, रात्री उशिरा चार संशयितांना अटक करण्यात आली. 13 मे 2025 रोजी संशयितांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर झाली. पुढील तपास उपनिरीक्षक स्मिता पाटील करत आहेत.