
सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्हा सहकारी बँक आता पूर्णपणे डिजिटल पाऊल टाकणार आहे. बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील यांनी ‘पेपरलेस बँकिंग’चे उद्दिष्ट जाहीर करताना ग्राहकांना अधिक सुरक्षित, जलद आणि आधुनिक सेवा उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट केले.
बँकेने नुकतेच आयटी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी इन्फोसिसची ‘फिनॅकल कोअर बँकिंग’ प्रणाली स्वीकारली आहे. या माध्यमातून ग्राहकांना मोबाईलवर सर्व व्यवहार अधिक सुरक्षितरीत्या करण्याची सुविधा मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर अध्यक्ष पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांच्यासह संचालक मंडळाने बंगळुरू येथील इन्फोसिसच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी इन्फोसिसचे हेड ऑफ सेल्स व्यंकटरमणा गोसावी, अधिकारी राजशेखरा व्ही. मया, सुहास पाटील आदी उपस्थित होते.
बैठकीत फिनॅकल प्रणाली व बँकिंग सुरक्षेबाबत सविस्तर चर्चा झाली. २०१३ पासून कोअर बँकिंग प्रणालीवर कामकाज सुरू असले तरी वाढत्या सायबर जोखमीमुळे सुरक्षित एप्लिकेशनची गरज निर्माण झाल्याचे बँक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. याबाबत रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांचा देखील आढावा घेण्यात आला.
बैठकीदरम्यानच खासदार नितीन पाटील यांनी बँक लवकरच पेपरलेस बँकिंगचा टप्पा गाठणार असल्याचे संकेत दिले.
दरम्यान, डॉ. सरकाळे यांनी बँकेच्या आर्थिक प्रगतीचा अहवाल सादर केला. बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी इन्फोसिसच्या आवारात वृक्षारोपण केले, तसेच नाबार्ड पुरस्कृत अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रालाही भेट दिली. येथे फिनॅकल प्रणालीच्या प्रशिक्षणार्थींशी संवाद साधण्यात आला.