
सातारा प्रतिनिधी
सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठरल्याने शहरातील इच्छुकांची लगबग वाढली आहे. मात्र, अंतिम उमेदवार कोण? याचा निर्णय खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हातात आहे. त्यामुळे उमेदवारांची भाऊगर्दी असूनही सर्वांचे लक्ष ‘दोन्ही राजें’च्या भूमिकेकडे लागले आहे.
२०१६ च्या निवडणुकीनंतर साताऱ्याची हद्दवाढ होऊन नगरसेवकांची संख्या ५० झाली आहे. यंदा नगराध्यक्षपदाची सोडत खुल्या प्रवर्गात निघाल्याने अनेकांच्या आकांक्षा उंचावल्या आहेत. वेदांतिकाराजे भोसले, अमित कुलकर्णी, सुवर्णा पाटील, अविनाश कदम, जयेंद्र चव्हाण आदींची नावे चर्चेत आहेत. परंतु, उमेदवार कोण ठरणार? हे ठरवणे अखेर राजेंच्याच हातात आहे.
पूर्वी नगरविकास आघाडी (नविआ) व सातारा विकास आघाडी (साविआ) या गटांतून पालिकेत रस्सीखेच झाली होती. माधवी कदम यांची थेट जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवड झाली होती. त्यानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांनी भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला. त्यामुळे आता पालिकेतील समीकरणेही भाजपकेंद्री ठरतील, असे संकेत आहेत.
दरम्यान, दोन्ही राजेंमध्ये मनोमिलन होऊन भाजपकडून एकच चेहरा पुढे येतो का, की स्वतंत्र गट म्हणून उमेदवारी दिली जाते, याकडे उत्सुकता आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीसुद्धा साताऱ्यात तिसरा पर्याय आजमावता येईल का, याची चाचपणी करत आहे.
एकंदरीत, इच्छुकांची गर्दी असूनही साताऱ्यात नगराध्यक्षपदाची गाडी अखेर ‘राजेंच्या निर्णयावरच’ धावणार, हे चित्र स्पष्ट होत आहे.