मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आपल्या पक्षातील नेत्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. शिवाय महामंडळांवर नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत. टप्प्या टप्प्याने एकनाथ शिंदेकडून देण्यात येतं असलेल्या नियुक्त्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराजी सूर पाहायला मिळतोय.
शिंदेंनी स्वपक्षीयांच्या नियुक्त्या केल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांची बुधवारी रात्री मुंबईत बैठक बोलावली. अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी उद्या बुधवारी रात्री साडेसात वाजता आमदारांची बैठक पार पडणार आहे.
सध्या सत्तेत केवळ एकाच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना महामंडळ तसेच मंत्रिपदाचे वाटप होत असल्यामुळे आमदारांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. बुधवारी होणाऱ्या आमदारांच्या बैठकीत याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली आहे.
मागील काही दिवसात देण्यात आलेल्या नियुक्त्या – १) प्रदूषण नियंत्रण बोर्ड अध्यक्ष – सिद्धेश कदम,
२) सिद्धिविनायक न्यासा प्रमुख – सदा सरवणकर,३) निलम गोऱ्हे – कॅबिनेट पदाचा दर्जा,४) माजी खासदार हेमंत पाटील – हळद संशोधन केंद्र प्रमूख पदी वर्णी,५) माजी खासदार आनंदराव अडसूळ- अध्यक्ष अनुसूचित जाती जमाती, ६) आदिवासी भागात कुपोषण रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या समितीचे प्रमूख डॉ. दीपक सावंत यांना राज्यमंत्री पदाचा दर्ज,
७) आमदार महेश शिंदे – उपाध्यक्ष, कृष्णा खोरे विकास महामंडळ, कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा,८)संजय शिरसाट – सिडको अध्यक्ष तसेच शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची अनुसूचित जाती जमातीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या आयोगाच्या अध्यक्षपदी अडसूळ यांची दीड वर्षांकरीता नेमणुक करण्यात आली आहे. आनंदराव अडसूळ यांनी काही दिवसांपूर्वी मला राज्यपाल पद दिलं जाईल, असा दावा केला होता.


