
मुंबई प्रतिनिधी
मुंबई|गिरगावमधील एका ६७ वर्षीय महिलेला शेअर ट्रेडिंगमध्ये अधिक परताव्याचे आमिष दाखवून ६७ लाख १५ हजार रुपयांची सायबर फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात सायबर फसवखोरांना १९ बँक खाती पुरवणाऱ्या २४ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.
दहिसर पश्चिम येथील भीमनगर परिसरात राहणारा आरोपी मोहित आकाश भोजराज याने कर्नाटकातील मुख्य आरोपीस ही खाती पुरवली होती. या खात्यांचा वापर करून मोठ्या प्रमाणात फसवणुकीची रक्कम गोळा करण्यात आली होती. विशेष बाब म्हणजे ही खाती भाजी विक्रेते, शेती व्यावसायिक यांच्यासारख्या सामान्य लोकांच्या नावावर उघडण्यात आली होती.
फसवणूक झालेल्या महिलेच्या तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान महिलेकडून एका खात्यात १६ लाख रुपये जमा केल्याचे निष्पन्न झाले. हे खाते ‘कल्याणी एंटरप्रायझेस’ या नावाने हेमंत माळी यांच्या नावावर असून, त्याचा वापर आरोपी मोहित करत असल्याचे उघड झाले.
पोलीस तपासात उघड झाले की आरोपी मोहितने १९ वेगवेगळ्या खात्यांची व्यवस्था केली होती. ही खाती उघडण्यासाठी तो भाजी विक्रेते आणि शेतकऱ्यांना लक्ष्य करत होता. व्यवसायासाठी खाते उघडायचे आहे, असे सांगून त्यांच्याकडून खाते उघडून घेतले जात होते आणि नंतर त्यांचा वापर सायबर फसवणुकीसाठी केला जात होता.
या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कर्नाटकातील मँगलोर येथील असून त्याच्याशी संबंधित तपास सध्या सुरू आहे. पोलिसांचा संशय आहे की या सर्व खात्यांमधून जमा झालेली रक्कम फसवणूक झालेल्या नागरिकांची आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास गतीने सुरू आहे.
या घटनेमुळे सायबर गुन्हेगारांच्या नव्या पद्धती उघड होत असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.