
वांद्रे | प्रतिनिधी
वांद्रे पूर्व येथील उच्च न्यायालयासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या महत्त्वाच्या भूखंडावर सध्या माफियांचा अघोषित डेरा पडला आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, या भूखंडावर मोठ्या प्रमाणात बांधकाम मलबा अवैधरीत्या आणून टाकला जात आहे. यासाठी ट्रक आणि रॅबिट मशीनचा वापर होत असून, कोणतीही अधिकृत परवानगी न घेता हे सर्व प्रकार चालू असल्याचे समजते.
या परिसरात काही वर्षांपूर्वी शासकीय इमारती व क्वार्टर्स पाडून जमीन मोकळी करण्यात आली होती. त्यानंतर ही जागा न्यायालयाच्या भविष्यातील विस्तारासाठी राखीव ठेवण्यात आली होती. मात्र, सध्या ही जागा अनधिकृत डंपिंग साईट बनली असून, त्यामुळे केवळ सरकारी मालमत्तेचे नुकसान होत नाही, तर परिसरातील नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे.
या प्रकरणात स्थानिक प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. परिणामी, माफियांचे मनोबल वाढले असून, न्यायालयाच्या नावाखाली राखीव असलेल्या भूखंडाचा वापर अनधिकृत धंद्यांसाठी होऊ लागला आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे त्वरित कारवाईची मागणी केली असून, संबंधित खात्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
(संपर्क केला असता, संबंधित अधिकाऱ्यांकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.)