
मुंबई प्रतिनिधी
१ मे महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधत ‘गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव २०२५’ चं उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडलं.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा देत करण्यात आल्या.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बलिदान दिलेल्या शहीद वीरांना कृतज्ञतेने अभिवादन करण्यात आलं. त्याचबरोबर, आपल्या कष्टाने संपूर्ण जगाचा गाडा चालवणाऱ्या कष्टकरी कामगार बांधवांना जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व शिलेदारांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांवर चालण्याचा निर्धार केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राची निर्मिती ही संघर्षातून घडलेली असल्याचं नमूद करत, संयुक्त महाराष्ट्राचा कलश आणणारे स्व. यशवंतराव चव्हाण यांचं स्मरण केलं. त्यांनी यावेळी केंद्र सरकारकडून न्यायप्रविष्ट असलेल्या बेळगाव, कारवार प्रश्नाचा उल्लेख करत, “जेव्हा हा भाग महाराष्ट्रात येईल, तेव्हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पूर्ण होईल,” असं ठाम मत व्यक्त केलं.
‘गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव २०२५’ या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा गौरव करण्यात आला, आणि राज्याच्या ऐतिहासिक लढ्याला उजाळा देण्यात आला.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या सोहळ्यात प्रांताध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल, खा,सुनेत्रा पवार, महाराष्ट्र महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी मंत्री छगन भुजबळ, प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी, मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक मान्यवर नेते पदाधिकारी उपस्थित होते.