
मुंबई प्रतिनिधी
मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला शुक्रवारी पहाटे अंधेरीतील मुकुंदनगर परिसरात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली. या घटनेनंतर संपूर्ण सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या असून तात्काळ शोध मोहीम सुरू करण्यात आली. मात्र, तपासणीनंतर काहीही संशयास्पद आढळले नाही.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे नियंत्रण कक्षात एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. महिला पोलीस शिपायाने तो फोन उचलला असता, फोनवरील व्यक्तीने “मरोळ पाईपलाइनजवळील अनमोल अपार्टमेंटमध्ये एक बॅग आहे, ज्यात बॉम्ब अथवा शस्त्र असू शकते” अशी माहिती दिली.
या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या विविध पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी बॉम्ब शोध पथक, डॉग स्क्वॉड यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा दाखल झाला. संपूर्ण परिसराची कसून झडती घेण्यात आली, मात्र कोणताही स्फोटक पदार्थ आढळला नाही.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी एका १९ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. चौकशीत त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की, संबंधित तरुणाला ऑटीझम आहे आणि तो अनेकदा अशा प्रकारच्या गोष्टी बडबडतो. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.