
लातूर प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातल्या रोहिणी शिवारात ड्रग्जच्या कारखान्यावर धाड टाकून पोलिसांनी तब्बल १७ कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहे. या कारवाईत पाच आरोपींना अटक केली आहे.
अधिक माहितीनुसार, प्रमोद केंद्रे हा मुंबई पोलीस दलात कार्यरत होता. त्यावेळी त्याची मुंबईतल्याच एका ड्रग्ज तस्कराशी ओळख झाली. ड्रग्ज तस्कराने केंद्रेला ड्रग्ज तयार करण्याचे प्रशिक्षण दिले होते. यातून अमाप पैसा मिळेल हे केंद्रेच्याही लक्षात आले. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी केंद्रेने आपल्या गावाकडे माळरानावर शेड बांधले. शेडमध्ये ड्रग्ज निर्मितीची उपकरणे बसवली. त्यानंतर त्यातून ड्रग्ज निर्मिती सुरु केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
ड्रग्ज निर्मिती सुरु होती. त्यातून बक्कळ पैसा मिळत होता. मात्र काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी एका ड्रग्ज पेडलरला अटक केली. ड्रग्ज पेडलरला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने प्रमोद केंद्रेच्या ड्रग्जच्या कारखान्याचा पत्ता सांगितला. पोलिसांनी पाळत ठेवत अखेर प्रमोदला बेड्या घातल्या. प्रमोदसह जुबेद हसन मातकर, मोहम्मद असलम खान, अहमद कलीम शेख आणि खाजा शफिक मोमीन यांनाही अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणात पोलीस अधिक तपास करीत आहेत.