
मुंबई प्रतिनिधी
उपनगरीय पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. पश्चिम रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचे ठिकाण समजले जाणाऱ्या मालाड स्थानकातील गर्दी कमी होणार आहे.
मलाड स्थानकात चढणे आणि उतरणे आता अधिक सुलभ होणार आहे. कारण या ठिकाणी नव्या पोलादी फलाट उभारण्यात आला आहे. या फलाटाचे काम पूर्ण झाले असून तो फलाट प्रवाशांच्या वापरासाठी खुला करण्यात आला आहे.
दोन्ही बाजुने चढता आणि उतरता येणार
या फलाटामुळे मालाड स्थानकात धीम्या लोकलमधून आता दोन्ही बाजुने चढता आणि उतरता येणार आहे. यामुळे एकाच फलाटांवर होणारी गर्दी विभागण्यास मदत होणार आहे. यामुळे धीम्या लोकलच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मालाडमधील नवा पोलादी फलाट 227 मीटर लांब आणि चार ते सहा मीटर रुंद आहे, तर उंची 900 मिमी आहे. या फलाट उभारणीसाठी 2.25 कोटी रुपयांचा खर्च आल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनित अभिषेक यांनी दिली. दोन दिवसांपूर्वी हा फलाट प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे.
स्थानकात लोकल येण्याच्या वेळेतही बदल
गोरेगाव ते कांदिवलीदरम्यान मालाड स्थानकाच्या पश्चिमेला सहावी मार्गिका उभारण्यात आली आहे. या मार्गिकेवरून रेल्वेगाड्या धावत असल्याने स्थानकात पूर्वीचा होम फलाट आता ‘बेट’ फलाट (दोन्ही दिशेला रेल्वे थांबा असलेला फलाट) झाला आहे. या दोन्ही फलाटांवर एकाच वेळी लोकल आल्यास प्रवाशांची मोठी गर्दी होत होती. ही गर्दी विभागण्यासाठी मालाड स्थानकात तात्पुरता पोलादी फलाट उभारण्यात आला आहे. तसेच एकाच वेळी दोन लोकल येण्याच्या वेळेत बदल केला आहे. त्यामुळे प्रवाशांची वर्दळ सुलभ होत आहे.