मुंबई प्रतिनिधी
धारावीतील बस डेपोजवळ गॅस सिलिंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत 12 ते 13 सिलिंडरचे एकामागून एक स्फोट झाल्याने परिसर हादरला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. रात्री पावणे दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सुदैवाने, या घटनेत कुणीही जखमी झाले नसल्याचे वृत्त आहे. मात्र, या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.
अनेक दुचाकींचे नुकसान
मिळालेल्या माहितीनुसार, धारावीतील पीएमजीपी कॉलनी परिसरात रस्त्यावर उभ्या असलेल्या सिलिंडरच्या ट्रकला अचानक आग लागली. त्यानंतर 12 ते 13 सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटांमुळे बस डेपोजवळ मोठा आवाज झाला आणि परिसर दणाणून गेला. या आगीच्या तीव्रतेमुळे ट्रकच्या आसपास असलेल्या 5 ते 10 दुचाकी जळून खाक झाल्या. आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अग्निशमन दलाची तत्काळ कारवाई
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 ते 10 गाड्या आणि पाण्याचे 10 टँकर घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या कुलिंगचे काम सुरू असून, पोलीस सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेत आहेत. सिलिंडरच्या स्फोटांमुळे ट्रकला लागलेल्या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. या घटनेमुळे काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती.
लोकांना सुरक्षितस्थळी हलवले
स्थानिक आमदार बाबुराव माने यांनी सांगितले की, आगीच्या पार्श्वभूमीवर आजूबाजूच्या घरांमधील लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने कारवाई करून आग आटोक्यात आणली.
डीसीपी गावडे यांची माहिती
डीसीपी गावडे यांनी सांगितले की, धारावी पोलिस ठाण्याच्या हद्दीत निसर्ग उद्यानाजवळ ही आग लागली. ट्रकमध्ये असलेल्या सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग वाढली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक आणि शेजारच्या पोलिस ठाण्यांतील अधिकारी घटनास्थळी पोहोचले. लोकांना सुरक्षित अंतरावर हलवण्यात आले. सुदैवाने या दुर्घटनेत कुणीही जखमी झाले नसल्याचे डीसीपी गावडे यांनी स्पष्ट केले. सध्या वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.


