
मुंबई प्रतिनिधी
शेतजमिनीच्या मालकी हक्काचा प्रमुख दस्तऐवज म्हणून ओळखला जाणारा सातबारा उतारा मोठ्या प्रमाणात अद्ययावत करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या महसूल विभागाने तब्बल पाच दशकांनंतर या महत्त्वाच्या दस्तऐवजात 11 मोठे बदल केले आहेत.या बदलांमुळे सातबारा उताऱ्यात अधिक स्पष्टता येणार असून, नागरिकांना आणि प्रशासकीय यंत्रणेला त्याचा मोठा फायदा होत आहे.
नव्याने सुधारित सातबारा उताऱ्यात खालील बदल करण्यात आले आहेत –
1) गावाचा कोड क्रमांक समाविष्ट – आता सातबारा उताऱ्यात गावाचे नाव आणि त्यासोबत कोड क्रमांक दिसेल.
2) जमिनीचे क्षेत्रफळ अधिक स्पष्ट – लागवडीयोग्य आणि अनुपयोगी जमीन वेगवेगळ्या प्रकारे दर्शवली जाईल आणि त्यांची एकूण बेरीज स्पष्टपणे नमूद केली जाईल.
3) नवीन मापन प्रणाली – शेतीसाठी हेक्टर-आर-चौरस मीटर आणि बिगरशेतीसाठी आर-चौरस मीटर ही मापन प्रणाली लागू केली आहे.
4) खाते क्रमांक थेट खातेदाराच्या नावासमोर – पूर्वी इतर हक्क रकान्यात असलेला खाते क्रमांक आता थेट खातेदाराच्या नावासमोर लिहिला जाईल.
5) मयत खातेदारांची नोंद वेगळी – मृत व्यक्तींच्या नावावर आडवी रेष मारण्यात येईल, त्याऐवजी कंसाचा वापर केला जाणार नाही.
6) प्रलंबित फेरफारांसाठी स्वतंत्र रकाना – जमीन ताबा हस्तांतरण प्रक्रियेत असलेल्या जमिनींसाठी प्रलंबित फेरफार हा नवीन रकाना तयार करण्यात आला आहे.
7) जुने फेरफार क्रमांक स्वतंत्रपणे दर्शवले – आधीच्या सर्व फेरफार क्रमांकांसाठी वेगळा रकाना उपलब्ध असेल.
8) खातेदारांची नावे ठळक अक्षरात – दोन खातेदारांच्या नावांमध्ये ठळक ओळी असल्याने नावे स्पष्ट वाचता येतील.
9) गट क्रमांकासोबत शेवटचा व्यवहार नमूद – गट क्रमांकासोबत अंतिम फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख इतर हक्क रकान्यात दिली जाईल.
10) बिनशेती जमिनींसाठी बदल – बिगरशेती जमिनींसाठी आर-चौरस मीटर हेच प्रमाणित मापन एकक राहील. जुडी आणि विशेष आकारणी रकाने हटवण्यात आले आहेत.
11) अकृषिक जमिनींसाठी विशेष सूचना – बिगरशेती सातबारा उताऱ्यावर आता “ही जमीन अकृषिक क्षेत्रामध्ये रूपांतरित झाल्याने गाव नमुना-12 लागू नाही” अशी सूचना असणार आहे.
सातबारा उताऱ्यातील सुधारणांचे लाभ
या सुधारित सातबारा उताऱ्यामुळे नागरिकांना अनेक फायदे मिळत आहे. जसे की,
सातबारा उतारा अधिक सुस्पष्ट आणि अचूक होतो.
जमिनीच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढते .
महसूल विभागाच्या कामकाजात गती आणि अचूकता.
डिजिटल प्रणालीमुळे ऑनलाईन नोंदी अधिक सुकर आणि सुरक्षित होते.