
लातूर प्रतिनिधी
महाराष्ट्रामध्ये सध्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
बीड, जालना यानंतर आता लातूरमध्ये सामान्य लोकांना मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे. भररस्त्यामध्ये तरुणाला बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. यामध्ये भरदिवसा आणि भररस्त्यात ही मारहाण करण्यात आला असून इतर लोकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली आहे.
लातूरमधील धक्कादायक व्हिडिओने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरवला आहे. तरुणाला नग्न करुन मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये सहा ते सात तरुण एका तरुणाला मारहाण करत आहेत. लातूरमधील एका बारमध्ये या तरुणांची पीडित मुलासोबत वाद झाला होता. मात्र यानंतर हा वाद विकोपाला गेला. तरुणाला टोळक्याने जबर मारहाण केली आहे. यामधील पीडित तरुण हा गंभीर जखमी असून त्याची प्रकृती गंभीर आहे. तरुणावर सध्या उपचार सुरू आहेत. मारहाण करणारे आरोपी हे फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत.
लातूर शहरातील अंबाजोगाई रोड परिसरात असलेल्या एका बारच्या पुढे हा थरार सुरू होता. याच ठिकाणी असलेल्या राजश्री बार आणि क्लबमध्ये काही तरुणांचा वाद झाला. हा वाद बारनंतर रस्त्यावर देखील झाला. रस्त्यावर टोळक्याने तरुणाला नग्न करुन मारहाण केली. याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर याचा व्हिडिओ शेअर करत प्रश्न उपस्थित केले आहेत.