
सांगली प्रतिनिधी
पुण्यात स्वारगेट स्थानकात शिवशाही मधील मुलीवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच शिवशाही बसमध्येच एका तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. पुणे ते सांगली शिवशाही बसमधून रात्री प्रवास करणाऱ्या तरुणीचा सहप्रवासी तरुणाने अश्लील चाळे करत विनयभंग केला.
आष्टा बसस्थानकातून सांगलीकडे येत असताना त्याने खिडकीजवळून तसेच सीटच्या मधून हात काढून तिला स्पर्श केला. अश्लील चाळे करू लागला. बस सांगली स्थानकात आल्यावर तिने हा प्रकार बसचालकासह प्रवाशांना सांगितला.
आष्टा ते सांगलीदरम्यान मार्गावर घडला प्रकार
हा प्रकार रात्री अकरा ते सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास आष्टा ते सांगलीदरम्यान मार्गावर घडला असून याप्रकरणी पीडित तरुणीने सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी वैभव वसंत कांबळेवर गुन्हा दाखल करत अटक केली आहे. शिरोळ तालुक्यातील ही 24 वर्षीय तरुणी पुण्यात नोकरीमुळे राहते. तरुणी स्वारगेट ते सांगली शिवशाही बसमधून सांगलीला येत होती. संशयित कांबळे हादेखील बसमध्ये होता. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत वैभवला ताब्यात घेतले. तरुणीने फिर्याद दिली. त्यानुसार वैभव कांबळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली.