
पुणे प्रतिनिधी
पुणे शहरातील मध्यवर्ती असणारे स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये आज पहाटे एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. तरुणीवर अत्याचार करून आरोपी फरार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडीत तरुणी स्वारगेट स्थानकात फलटणला जाण्यासाठी आली होती. मात्र, तिथे असलेल्या एक जणाने फलटणाला जाणारी बस दुसरीकडे थांबली असल्याचे सांगितले. बस दाखवण्याच्या बहाण्याने आरोपीने तरुणीला बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये चढवले. तरुणी पाठोपाठ आरोपीसुद्धा त्या एसटी बसमध्ये घुसला आणि त्याने तरुणीवर अत्याचार केला
पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, आरोपीची ओळख पटली आहे. त्याच्या मागावर आठ टीम आहेत.आरोपी शिरुर गावचा असून त्याच्यावर 392 चा गुन्हा दाखल आहे. दत्तात्रय गाडे असे आरोपीचे नाव असल्याचे समजते.
या प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ‘साम टिव्ही’शी बोलताना सांगितले की, तरुणीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने सीसीटीव्हीची तपासणी करत आरोपीची शोधाला सुरुवात केली आहे. आरोपीचा सीडीआर असेल सर्व माहिती गोळा केली आहे. एक दोन दिवसात आरोपीला अटक होईल. अशा घटना घडू नये म्हणून सर्तक राहण्याची आवश्यकता आहे.
शक्ती कायदा लागू करण्याची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेश शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी स्वारगेटमधील बसमध्ये तरुणीवर अत्याचाराच्या घटनेवर ट्विट करत म्हटले आहे की, बसमध्ये मुलीवर अत्याचार झाल्याची दुर्देवी घटना समोर आली. ज्या ठिकाणी ही घटना घडली ते स्वारगेट बसस्थानक राज्यातील प्रमुख बस स्थानकांपैकी एक असून समोरच पोलिस स्थानकही आहे. तरी एका सराईत गुन्हेगाराकडून बिनदिक्कत अत्याचार करण्यात आल्याने सार्वजनिक स्थळांवरील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित घटनेतील मुख्य आरोपीला अटक करण्याबरोबरच राज्यभरात अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून राज्य सरकारकडून कठोर उपाययोजना केल्या पाहिजेत.