मुंबई प्रतिनिधी
मुंबई : प्रेयसीच्या कुटुंबीयांकडून होत असलेल्या कथित मानसिक छळ आणि धमक्यांना कंटाळून ३२ वर्षीय पोलीस शिपायाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी संबंधित तरुणीच्या आई-वडिलांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला आहे. घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
भैयासाब भीमराव व्हावळे असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांची ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई पोलीस दलात चालक पदावर नियुक्ती झाली होती. सध्या ते कलिना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्राथमिक प्रशिक्षण घेत होते. १५ मार्च रोजी सकाळी त्यांनी प्रशिक्षण केंद्रातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले.
घटनेनंतर पोलिसांनी केलेल्या तपासात भैयासाब यांच्या खिशात एक सुसाईड नोट आढळून आली. या चिठ्ठीत त्यांनी आपल्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप करत काही व्यक्तींची नावे नमूद केल्याची माहिती आहे. त्यामध्ये प्रेयसीच्या वडिलांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा, तर तिच्या आईने “आत्महत्या कर, नाहीतर तुझी नोकरी घालवू” अशी धमकी दिल्याचा उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे.
भैयासाब यांचे नांदेड जिल्ह्यातील हादगाव येथील दिव्या नावाच्या तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र, या नातेसंबंधाला तरुणीच्या कुटुंबीयांचा विरोध होता, अशी माहिती समोर आली आहे. या विरोधातूनच संबंधितांकडून वारंवार धमक्या व मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
भैयासाब यांचे वडील भीमराव व्हावळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाकोला पोलिसांनी तरुणीच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्येपूर्वी सापडलेल्या चिठ्ठीची सत्यता पडताळण्यासाठी पोलिसांकडून फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. हस्ताक्षर तपासणी अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेमुळे प्रशिक्षण केंद्रातील सहकाऱ्यांमध्ये तसेच पोलीस वर्तुळात शोककळा पसरली असून, तरुण पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूमागील नेमक्या परिस्थितीचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.


