
मुंबई प्रतिनिधी
राज्याचा गाडा ज्या इमारतीतून हाकला जातो त्या मंत्रालयामध्ये पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न झाला आहे. एका व्यक्तीने जोरदार घोषणाबाजी करत मंत्रालयाच्या इमारतीतील सुरक्षा जाळीवर उडी मारली आहे.
मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून या व्यक्तीने जोरदार घोषणाबाजी केली आहे. मंत्रालयातील सुरक्षारक्षकांनी तातडीने धाव घेऊन या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. मागील अनेक वर्षांपासून आपल्या मागण्या मान्य होत नसल्यामुळे या व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीचं महसूल विभागामध्ये काम होतं. मागील काही दिवसांपासून काम पूर्ण व्हावं यासाठी तो मंत्रालयाचे उंबरठे झिजवत होता. पण त्याचं काम पूर्ण होत नव्हतं. वारंवार विनंती करूनही काम होत नसल्यामुळे या तरुणाने इंकलाब जिंदाबादच्या घोषणा देत सातव्या मजल्यावरून जाळीवर उडी मारली. यावेळी त्याने महसूल खात्याची जागेसंदर्भात काही पत्रक भिरकावली होती. या तरुणाने जाळीवर उडी मारल्यानंतर एकच खळबळ उडाली. सुरक्षारक्षकांनी धाव घेऊन या तरुणाला बाहेर काढलं.
यावेळी मंत्रालातील सुरक्षारक्षकांची चांगलीच दमछाक झाली. या तरुणाचं नाव अद्याप समोर येऊ शकलं नाही. महसूल खात्यातील जागांसदर्भात त्याने हे पाऊल उचललं होतं. मंत्रालयाच्या जाळीवर उडी मारताना त्याला दुखापत झाल्याचं कळतंय. जाळीवर बराच वेळ तो पोटाला धरून बसलेला होता. अखेरीस सुरक्षारक्षकांनी त्याला बाहेर काढलं आहे. त्याची चौकशी सुरू आहे.