नवी मुंबई : प्रतिनिधी
नवी मुंबई : बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांना मंगळवारी पहाटे अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने नवी मुंबईत खळबळ उडाली. प्रकृती बिघडताच त्यांना तातडीने अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तत्काळ शस्त्रक्रिया करत त्यांच्या शरीरात दोन स्टेंट बसवले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
म्हात्रे यांच्या सुपुत्र निलेश म्हात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री अडीचच्या सुमारास त्यांना अस्वस्थता जाणवू लागल्याने तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी वेळ न दवडता शस्त्रक्रिया केल्याने मोठा धोका टळला. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून डॉक्टरांच्या कडक देखरेखीखाली त्यांना ठेवण्यात आले आहे.
या घटनेची माहिती समजताच नवी मुंबईतील राजकीय व सामाजिक वर्तुळात चिंतेचे वातावरण पसरले. रुग्णालयाबाहेर समर्थक व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. विविध पक्षांचे नेते आणि सामाजिक संस्थांकडून त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना व्यक्त करण्यात येत आहेत.
बेलापूर मतदारसंघातून विधानसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या मंदा म्हात्रे या नवी मुंबईतील प्रभावी महिला नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. पाणीपुरवठा, पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण तसेच मच्छीमार समाजाच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे.
दरम्यान, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील काही दिवस त्यांना विश्रांती आवश्यक असून त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


