
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर गेल्या आहेत. कारण याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी निश्चित होती, परंतु काही कारणास्तव ही सुनावणी होऊ शकली नाही.
नेत्यांनी एप्रिल-मे महिन्यात निवडणुका होतील अशी आशा ठेवली होती. त्यांना पुन्हा एकदा दीर्घकालीन आशा ठेवावी लागणार आहे.
पुणे महापालिकेची निवडणूक मार्च २०२२ पासून रखडली आहे. त्यानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुका पार पडल्याने आता आणखी किती प्रतीक्षा करावी लागेल, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र, या प्रकरणातील याचिका सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या बोर्डावर २९ व्या क्रमांकावर असल्याने प्रत्यक्ष सुनावणी होणार होती. परंतु कोर्ट क्रमांक ३ मध्ये आज दुपारी एक वाजेपर्यंतच कामकाज होतं.
कोर्ट क्रमांक ८ ने फक्त ८ व्या क्रमांकापर्यंतची प्रकरणे ऐकली. त्यानंतर कामकाज संपताना याचिकाकर्त्याने वकील आणि सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी ४ मार्च ही तारिख मागितली. कोर्टाने त्यावर विचार करू असे म्हटले. त्यामुळे आता पावसाळ्याआधी एप्रिल मे ची डेडलाईन जवळ येत असताना ४ मार्चला तरी काही ठोस निर्णय घेतला जाणार का ? यावर पुढील निवडणुकांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.