पनवेल प्रतिनिधी
मंत्री, आमदार, खासदार केंद्रातील मंत्री गडकरी देखील येऊन गेले; परंतू मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. यामध्ये आता नव्यानेच बांधकाम मंत्री झालेले शिवेंद्रराजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी केली.
२० फेबु्रवारी रोजी त्यांनीदेखील या महामार्गाच्या कामाची पाहणी केली. मात्र या रस्त्याचे काम नेमके किती दिवसांत, महिन्यांत किंवा वर्षांत पूर्ण होईल? याचे उत्तर त्यांनादेखील देता आलेले नाही.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम सध्या सुरु असले तरी त्याची गती अत्यंत संथ आहे. सुरुवातीला २०१० ला मुंबई गोवा महामार्गाचे रुंदीकरण सुरु झाले. पहिल्या टप्प्यामध्ये पळस्पे ते इंदापूर आणि त्यानंतर पुढील टप्पा करण्याबाबतचे नियोजन होते. दरम्यान, याकरिता नियुक्त करण्यात आलेल्या कंपनीने माघार घेतल्यामुळे हे काम रखडले. त्याचबरोबर निधी वेळेवर मिळाला नसल्यानेसुद्धा मुंबई गोवा महामार्ग ‘ऑन ट्रॅक’वर आला नाही. यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनीसुद्धा स्वतः लक्ष घातले.
मुंबई गोवा हायवेने कात टाकावी, या उद्देशाने त्यांनी विशेष प्रयत्न केले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी त्यांनी समन्वय साधला. तत्कालीन मंत्री रविंद्र चव्हाण यांनी यासाठी विशेष प्रयत्न आणि पाठपुरावा केला. परंतु तरीसुद्धा हा महामार्ग अपुराच आहे. २०२४ साली भाजप महायुतीचे पुन्हा एकदा सरकार आले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पदभार स्वीकारला आहे.
यानंतर त्यांनी बरीच वर्षे रखडपट्टी झालेल्या मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली. पळस्पे या ठिकाणाहून त्यांच्या दौर्याला सुरुवात झाली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी उपस्थित होते. पेणच्या वेशीवर माजी मंत्री रवींद्र पाटील आणि राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची भेट घेतली. त्यांनीसुद्धा यासंदर्भातील काही पर्याय आणि उर्वरित कामे सूचवली आहेत.


