
हिंगणघाट प्रतिनिधी
शांतता-वातावरण नाही, आवश्यक त्या सुविधा नाहीत, परिस्थिती नसल्याचे रडगाणे सांगून वेळ मारून नेतात. मात्र, येथील गिरणी कामगार प्रकाश धोपटे यांची कन्या पुजा राजस्व अधिकारी झाली.
प्रकाश धोपटे यांनी मिल बंद पडल्यानंतर घरीच उपजीविकेसाठी मिर्ची कांडप सुरू केले. पुजाने प्राथमिक ते बारावीपर्यंतचे शिक्षण येथील भारत विद्यालय पुर्ण केले. त्यानंतर सेवाग्राम येथील बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेट्रॉनिक्स अॅण्ड टेली कम्युनिकेशन या विषयात बीई केल्यावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा विचार तिच्या मनात आला. त्याचा अभ्यास करण्यासाठी पुणे येथील एका अकॅडमीत तिने प्रवेश घेतला. हे सर्व करताना वडील व गृहिणी असलेल्या आईचे संपूर्ण पाठबळ होतेच. त्याशिवाय देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक असलेले तिचे मामा प्रा. राऊत यांनी तिला मार्गदर्शन केले.
आजच्या तरुणांनी परिश्रम, जिद्द, आणि संयम ठेऊन प्लॅन बी तयार ठेवल्यास उज्वल भविष्य त्याच्या आवाक्या बाहेर नाही असा संदेश पूजा विद्या प्रकाश धोपटे या लेबर कॉलनीत राहणार्या एका मिल कामगाराच्या कन्येने दिला. प्लॅन बी स्पष्ट करताना तीने सांगितले की लोकसेवा आयोगाच्या परीक्षा या कठीण असून यात निवड होण्याची संधी फारच कमी असते. संयम ठेऊन वाट बघत असताना यात यश आले नाही तर तरुणांनी दुसरा पर्याय आपल्या जवळ तयार ठेवावा. त्यामुळे त्याच्यात यश मिळाले नाही तर नैराश्य येणार नाही. तरुणांची पराभूत मनोवृत्ती नाहीशी झाली पाहिजे असेही ती म्हणाली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राजस्व अधिकारी या पदाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. परंतु, एवढ्या वरच आपण थांबणार नसून भारतीय प्रशासनिक सेवेतील उच्च परीक्षा उत्तीर्ण करण्याचे स्वप्न असल्याचेही तिने सांगितले. महात्मा ङ्गुले, डॉ आंबेडकर हें आपले आदर्श असून बाबा आमटे व प्रकाश आमटे हे आवडते व्यक्तिमत्त्व असल्याचे तीने सांगितले.