मुंबई प्रतिनिधी
डेटिंग ॲपच्या माध्यमातून बड्या घरच्या पुरुषांना जाळ्यात ओढून, त्यांना धमकावून पैसे उकळणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा साकीनाका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. घाटकोपर-साकीनाका परिसरातील एका कॅफेमध्ये सुरू असलेल्या या रॅकेटवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, या कामासाठी दिल्लीहून २५ ते ३० तरुणींना खास मुंबईत पाचारण करण्यात आले होते.
सध्या तरुणाईमध्ये विविध डेटिंग ॲप्सची मोठी क्रेझ आहे. याच आवडीचा फायदा घेत या टोळीने आपले जाळे पसरवले होते. या रॅकेटमधील तरुणी डेटिंग ॲपवर सक्रिय राहून श्रीमंत पुरुषांना ‘लाईक’ करायच्या आणि त्यांच्याशी जवळीक साधून चॅटिंग सुरू करायच्या. समोरच्या व्यक्तीचा विश्वास संपादन केल्यानंतर, या तरुणी पुरुषांना साकीनाका येथील एका ठराविक ‘कॅफे क्लब’मध्ये भेटायला बोलवत असत.
पीडित तरुण कॅफेमध्ये पोहोचल्यानंतर तरुणींकडून भरमसाठ खाण्यापिण्याची ऑर्डर दिली जात असे. साध्या पदार्थांचे बिलही २५ ते ५० हजार रुपयांच्या घरात आकारले जायचे. ग्राहकाने या बिलाला विरोध केल्यास कॅफेमधील बाऊन्सर्स त्यांना धाक दाखवून पैसे वसूल करायचे. इतकेच नव्हे तर, पैसे न दिल्यास तरुणींकडून लैंगिक अत्याचाराची खोटी तक्रार करण्याची धमकी दिली जात होती. या सर्व प्रकारात कॅफेचा मालकही सक्रिय सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, साकीनाका पोलिसांनी संबंधित कॅफेवर छापा टाकला असता, एका तरुणाला बाऊन्सर्सनी घेरून धमकावल्याचे समोर आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पीडित तरुणाची सुटका केली. या प्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दिल्लीहून आलेल्या तीन तरुणींसह इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी हा कॅफे सील केला असून या टोळीने आतापर्यंत किती जणांना गंडा घातला आहे, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.


