मुंबई प्रतिनिधी
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात बिबट्याच्या हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या घटनेनंतर वन विभागाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. शनिवारी (१४ मार्च २०२६) सकाळच्या सुमारास उद्यानाच्या हद्दीत आणि मालाड परिसरात विहिरीवरून पाणी आणण्यासाठी गेलेल्या चंदू खरपडे यांच्यावर बिबट्याने अचानक झडप घातली.
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे घाबरलेल्या चंदू खरपडे यांनी मदतीसाठी जोरात आरडाओरड केली. त्यांच्या आर्त किंकाळ्या ऐकून त्यांचा मुलगा उमेश चंदू खरपडे (वय २४) तातडीने घटनास्थळी धावून गेला आणि वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. या धावपळीत चंदू खरपडे यांच्या डोक्याला, विशेषतः कानाजवळ गंभीर दुखापत झाली, तर उमेश खरपडे यांच्या हाताच्या बोटाला किरकोळ जखम झाली.
जखमी झालेल्या दोघांनाही तातडीने उपचारासाठी कांदिवली येथील शताब्दी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
प्रशासनाचा इशारा : एकटे फिरणे टाळा
या घटनेनंतर उद्यान प्रशासनाने नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. उद्यानाच्या परिसरात बिबट्यांचा वावर अधूनमधून आढळत असल्याने नागरिकांनी उद्यानाच्या अंतर्गत भागात किंवा लगतच्या जंगल परिसरात एकटे जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच उद्यानाला लागून असलेल्या वसाहतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे. अन्नाच्या शोधात बिबट्यांसारखे वन्यप्राणी मानवी वस्तीजवळ येण्याची शक्यता कमी करण्यासाठी ही खबरदारी आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
एका तासात बिबट्या जेरबंद
घटनेनंतर संबंधित बिबट्या जवळच्या एका चरात लपून बसल्याचे वन विभागाच्या पथकाच्या निदर्शनास आले. यानंतर आरएफओ निकेत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यानाच्या पथकाने आणि Wildlife Welfare Association (WWA) या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने तातडीने कृती आराखडा तयार केला.
वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून अवघ्या एका तासाच्या आत बिबट्याला भूल देणारे इंजेक्शन (डार्ट) मारून सुरक्षितरीत्या जेरबंद केले. त्यानंतर त्या बिबट्याला उद्यानातील बचाव केंद्रात हलवण्यात आले आहे.
वन विभागाने या घटनेनंतर परिसरात गस्त वाढवली असून नागरिकांनी जंगल परिसरात फिरताना अत्यंत दक्षता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


