पुणे प्रतिनिधी
लग्नानंतर सततच्या पैशांच्या मागण्या, मानसिक आणि शारीरिक छळ तसेच दुसऱ्या लग्नाची धमकी यामुळे त्रस्त झालेल्या २२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. वैष्णवी लाटे असे या दुर्दैवी विवाहितेचे नाव असून, तिच्या मृत्यूमुळे परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी हिचे लग्न यशवंत लाटे याच्याशी ७ मे २०२५ रोजी मोठ्या थाटामाटात पार पडले होते. मात्र लग्न ठरण्यापासूनच पैशांच्या मागण्यांचा सिलसिला सुरू झाल्याचा आरोप वैष्णवीच्या माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे. लग्न ठरल्यानंतर नव्याने बांधलेल्या घरासाठी फर्निचर घेण्याच्या कारणावरून यशवंतने दोन लाख रुपयांची मागणी केली होती. मुलीचे आयुष्य सुखी व्हावे या अपेक्षेने वैष्णवीच्या कुटुंबीयांनी ती रक्कम दिली होती.
लग्नाच्या वेळी मानपानासह संसारोपयोगी वस्तूही देण्यात आल्या होत्या. मात्र लग्नानंतर काही महिन्यांतच वैष्णवीवर छळ सुरू झाल्याचे समोर आले. पती यशवंत याचे इतर मुलींशी मोबाईलवर चॅटिंग असल्याचे वैष्णवीच्या लक्षात आले. याबाबत तिने पतीला जाब विचारला असता तिच्यावर मारहाण करून तिला माहेरी पाठवून दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
यानंतर वैष्णवीला पुन्हा सासरी नांदवायचे असेल तर पाच लाख रुपये आणि चारचाकी गाडी घेऊन ये, अशी अट घालण्यात आली होती. मुलीचा संसार वाचावा या भावनेने वैष्णवीच्या कुटुंबीयांनी १७ जानेवारी २०२६ रोजी पाच लाख रुपये रोख दिले असल्याचेही सांगितले जाते. मात्र इतके करूनही पैशांच्या मागण्या थांबल्या नाहीत.
घरात इंटेरियर करण्यासाठी आणखी २० लाख रुपये आणावेत, अशी नवी मागणी करण्यात आली. “पैसे आणले नाहीस तर तोंड दाखवू नकोस,” अशी धमकी पतीने दिल्याचा फोन वैष्णवीने गेल्या आठवड्यात आपल्या आईला केला होता. या फोननंतर चिंतेत पडलेल्या वैष्णवीच्या आईने तिच्या सासरी जाऊन चर्चा केली. मात्र “पैसे दिले नाहीत तर मुलाचे दुसरे लग्न लावून देऊ,” असे सांगत सासरच्यांनी वैष्णवीच्या आईलाही सुनावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आई भेटून गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वैष्णवीने राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आयुष्याची स्वप्ने डोळ्यांत घेऊन सासरी गेलेल्या या तरुणीने छळाच्या जाचाला कंटाळून टोकाचा निर्णय घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर वैष्णवीच्या आईने पोलिस ठाण्यात धाव घेत पती यशवंत लाटे तसेच सासू-सासऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
या घटनेमुळे हुंडाबळी आणि विवाहित महिलांवरील कौटुंबिक छळाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा प्रकारांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.


