नवी मुंबई प्रतिनिधी
स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न उराशी बाळगून सिडकोच्या घरांसाठी अर्ज केलेल्या हजारो इच्छुकांची प्रतीक्षा आता संपणार आहे. ईडब्ल्यूएस आणि एलआयजी प्रवर्गाच्या वर्गवारीवरून निर्माण झालेल्या न्यायालयीन वादामुळे रखडलेली सिडकोच्या घरांची बहुप्रतीक्षित सोडत अखेर २७ नोव्हेंबर २०२६ रोजी काढण्यात येणार आहे. सिडकोने यासंदर्भात अधिकृत घोषणा केली असून, न्यायालयीन अडथळे दूर झाल्याने सोडतीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या अर्जदारांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
सिडकोच्या ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या महत्त्वाकांक्षी गृहयोजनेची घोषणा डिसेंबर २०२५ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाय १.०) अंतर्गत करण्यात आली होती. या योजनेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) आणि अल्प उत्पन्न गट (एलआयजी) अशा प्रवर्गांमध्ये घरांचे वाटप प्रस्तावित होते. मात्र, या प्रवर्गांच्या वर्गवारीवरून वाद निर्माण झाला. त्यानंतर काही अर्जदारांनी न्यायालयात धाव घेतल्याने एलआयजी प्रवर्गातील घरांची सोडत अंतरिम आदेशामुळे स्थगित करण्यात आली होती. परिणामी, घरासाठी पैसे भरून प्रतीक्षा करणाऱ्या हजारो अर्जदारांची घालमेल वाढली होती.
मात्र, आता न्यायालयातील संबंधित याचिका फेटाळण्यात आल्याने सिडकोने सोडतीची तारीख निश्चित केली आहे. विशेष म्हणजे, योजनेतील एलआयजी या संज्ञेऐवजी ‘बिगर ईडब्ल्यूएस’ (नॉन-ईडब्ल्यूएस) अशी वर्गवारी ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. ईडब्ल्यूएस प्रवर्गातील घरांची सोडत यापूर्वीच पार पडली असून, आता बिगर ईडब्ल्यूएस प्रवर्गातील अर्जदारांसाठी २७ नोव्हेंबरला संगणकीय सोडत होणार आहे.
अर्ज मागे घेण्यासाठी दहा दिवसांची मुदत
दरम्यान, सिडकोने अर्जदारांना योजनेतून बाहेर पडण्याचाही पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ज्या अर्जदारांना नव्या वर्गवारीनुसार सोडतीत सहभागी व्हायचे नाही, त्यांना घोषणेच्या प्रसिद्धीपासून दहा दिवसांच्या आत ऑनलाइन अर्ज मागे घेता येणार आहे. यासाठी अर्जदारांनी सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळावरील स्वतःच्या लॉगिनमध्ये जाऊन अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
महत्त्वाचे म्हणजे, अर्ज मागे घेणाऱ्या अर्जदारांना भरलेली बुकिंग रक्कम कोणतीही कपात न करता पूर्णपणे परत केली जाणार आहे. अर्ज मागे घेण्याची विनंती केल्यानंतर १५ दिवसांच्या आत ही रक्कम नोंदणीकृत बँक खात्यात जमा केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, अर्ज मागे घेतल्यानंतर संबंधित अर्जदाराला २७ नोव्हेंबरच्या सोडतीत सहभागी होता येणार नाही.
अर्ज कायम ठेवल्यास सोडतीत सहभाग
ज्या अर्जदारांना योजनेतून बाहेर पडायचे नाही, त्यांनी कोणतीही अतिरिक्त प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही. निर्धारित दहा दिवसांच्या मुदतीत अर्ज मागे न घेतल्यास त्यांचा सोडतीतील सहभाग कायम राहणार आहे. त्यामुळे अर्जदारांनी आपल्या प्रवर्गाची वर्गवारी, अर्जातील माहिती आणि सिडकोकडून प्रसिद्ध होणाऱ्या सूचनांची काळजीपूर्वक पडताळणी करणे आवश्यक आहे.
न्यायालयीन वाद, वर्गवारीचा पेच आणि सोडतीला लागलेला विलंब या सर्व अडथळ्यांनंतर अखेर २७ नोव्हेंबरचा मुहूर्त निश्चित झाला आहे. आता संगणकीय सोडतीत कोणाच्या नशिबी घराची चावी येणार आणि कोणाला पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार, याची उत्सुकता नवी मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशातील हजारो कुटुंबांना लागली आहे.
अधिकृत माहिती व अर्जदारांच्या सूचनांसाठी : [सिडको होम्स अधिकृत संकेतस्थळ](https://cidcohomes.com


