कल्याण प्रतिनिधी
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्स यांना मारहाण केल्याच्या गंभीर आरोपामुळे चर्चेत आलेले शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे यांची तुरुंगात अचानक प्रकृती खालावली आहे. कल्याणच्या आधारवाडी कारागृहात असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने कारागृह प्रशासनाने तातडीने त्यांना उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये हलवले. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घडामोडीमुळे आधीच राज्यभर गाजत असलेल्या डॉक्टर मारहाण प्रकरणाला पुन्हा एकदा वेगळे वळण मिळाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळपासून रमेश म्हात्रे यांना अस्वस्थ वाटू लागले होते. कारागृहातील वैद्यकीय पथकाने त्यांची तपासणी केली. मात्र, प्रकृतीची अधिक तपासणी आणि उपचारांची आवश्यकता लक्षात घेऊन त्यांना पुढील उपचारांसाठी उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करून उपचार सुरू केले. सध्या त्यांना नेमका कोणता त्रास झाला, याचे निदान आणि वैद्यकीय तपशील अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत पुढील वैद्यकीय अहवालाकडे लक्ष लागले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा तुरुंगात
रमेश म्हात्रे यांच्यावरील डॉक्टर आणि नर्स मारहाणीचे प्रकरण ६ जुलै २०२६ रोजी डोंबिवलीतील शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयात घडले होते. प्रसूतीसाठी दाखल असलेल्या महिलेच्या उपचारासंदर्भातील वादातून डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या घटनेचे व्हिडिओ समोर आल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला होता.
या प्रकरणात म्हात्रे यांना सुरुवातीला जामीन मिळाला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने जामिनाच्या आदेशाला स्थगिती दिल्यानंतर आणि पुढील न्यायालयीन घडामोडींनंतर सर्वोच्च न्यायालयाने २८ सप्टेंबर रोजी त्यांना पुन्हा आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार त्यांनी आत्मसमर्पण केले आणि त्यांची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात आली.
जामीन अर्जही घेतला मागे!
दरम्यान, या प्रकरणात जामीन मिळवण्यासाठी रमेश म्हात्रे आणि अन्य आरोपींनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, ४ नोव्हेंबर रोजी न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर आरोपींच्या वतीने जामीन अर्ज मागे घेण्यात आला. महत्त्वाच्या साक्षीदारांच्या साक्षी अद्याप नोंदवायच्या असल्याने जामिनाला विरोध करण्यात आला होता. त्यामुळे म्हात्रे यांचा आधारवाडी कारागृहातील मुक्काम कायम राहिला.
आता कारागृहातच त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील कथित हल्ल्यामुळे चर्चेत आलेले म्हात्रे आता स्वतः रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीत किती लवकर सुधारणा होते, त्यांना रुग्णालयात किती दिवस ठेवावे लागते आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेवर या वैद्यकीय परिस्थितीचा काही परिणाम होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


