मुंबई प्रतिनिधी
दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत विनापरवाना फटाक्यांची विक्री करणाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता फटाक्यांची विक्री, साठवणूक, प्रदर्शन आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत अवघ्या सहा दिवसांत तब्बल २७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ४ ते ९ नोव्हेंबरदरम्यान ही कारवाई करण्यात आली असून, विनापरवाना फटाके विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या विक्रीसाठी अनेक ठिकाणी रस्त्यांवर, पदपथांवर आणि गर्दीच्या सार्वजनिक जागांवर अनधिकृत दुकाने थाटली जातात. अशा दुकानांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच आग लागणे आणि जीवितहानी होण्याचा धोका असतो. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी ही विशेष मोहीम सुरू केली आहे.
पोलीस उपायुक्त (ऑपरेशन्स) अकबर पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ३ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२६ या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशानुसार, पोलीस आयुक्तांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याची किंवा राज्य सरकारची अधिकृत परवानगी घेतल्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी फटाक्यांची विक्री, साठवणूक, प्रदर्शन किंवा विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करता येणार नाही. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दादर, कुर्ला, जोगेश्वरीत विक्रेत्यांवर गुन्हे
पोलिसांच्या या कारवाईत दादर, कुर्ला आणि जोगेश्वरी परिसरातील घटनाही समोर आल्या आहेत. रविवारी दादर पोलिसांनी वरळी कोळीवाडा येथील रहिवासी संतोष गुप्ता याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी कोणताही अधिकृत परवाना न घेता त्याने फटाक्यांचे दुकान थाटल्याचा आरोप आहे. संभाव्य धोके टाळण्यासाठी आवश्यक खबरदारीही घेतली नसल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. त्याच्याविरुद्ध स्फोटक पदार्थ कायदा, मानवी जीवितास धोका निर्माण करणे आणि सरकारी आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.
दरम्यान, शुक्रवारी कुर्ला पोलिसांनी मालाड पूर्व येथील रहिवासी सुनील गुसा (३३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मालाड पूर्वेतील एका शाळेजवळ सार्वजनिक रस्त्यावर लाकडी टेबल मांडून तो फटाक्यांची विक्री करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याच्याकडे फटाके विक्रीचा कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे तपासात स्पष्ट झाले.
तसेच रविवारी जोगेश्वरी पोलिसांनी जोगेश्वरी स्टेशन रोडवरील हिंदुस्तान हॉटेलजवळ कारवाई केली. पदपथावर लाकडी टेबल मांडून विनापरवाना फटाके विक्री करणाऱ्या रुपेश खन्ना (३५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहुलमध्ये ५०० मीटर परिसर संवेदनशील घोषित
फटाक्यांच्या विक्रीवरील निर्बंधांबरोबरच मुंबई पोलिसांनी माहुल परिसरातील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) यांच्या रिफायनरी व बॉटलिंग प्लांटच्या सुरक्षेसाठीही विशेष उपाययोजना केल्या आहेत.
या पेट्रोलियम प्रकल्पांच्या निर्धारित बफर क्षेत्राबाहेरील ५०० मीटर परिसरात फटाके फोडणे, फटाके फेकणे किंवा रॉकेटसारखी आकाशात उडणारी स्फोटक साधने सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. पेट्रोलियम पदार्थांचा साठा आणि ज्वलनशील वातावरण लक्षात घेता, ठिणगीमुळेही मोठा अपघात घडू शकतो. त्यामुळे हा परिसर संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.
रॉकेट आणि आकाशात उडणाऱ्या फटाक्यांवरही २५ नोव्हेंबरपर्यंत बंदी
दरम्यान, मुंबईतील फटाक्यांमुळे लागलेल्या आगींच्या घटनांची गंभीर दखल घेत महापालिकेने ९ नोव्हेंबरपासून आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिका हद्दीत रॉकेट आणि आकाशात उडणाऱ्या फटाक्यांच्या वापरावर २५ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी सार्वजनिक तसेच खासगी जागा, इमारतींचे टेरेस, बाल्कनी, अंगणे, पार्किंग आणि झोपडपट्टी परिसरांनाही लागू आहे.
८ नोव्हेंबर रोजी मुंबई अग्निशमन दलाला आगीच्या तब्बल १४२ घटनांचे कॉल प्राप्त झाले होते. त्यापैकी १३७ घटना फटाक्यांमुळे घडल्याची माहिती समोर आली आहे. डोंगरी आणि विद्याविहार परिसरातील आगींच्या घटनांनंतर प्रशासनाने अधिक कठोर पावले उचलली आहेत.
त्यामुळे आता मुंबईत विनापरवाना फटाके विक्री करणाऱ्यांबरोबरच प्रतिबंधित प्रकारचे फटाके फोडणाऱ्यांवरही पोलिस आणि महापालिका प्रशासनाची नजर राहणार आहे. सणाचा आनंद साजरा करताना नागरिकांच्या जीविताला आणि मालमत्तेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.


