डोंगरी, कुर्ला, मालाड, घाटकोपरमध्ये आगीचे तांडव; झोपड्या, दुकाने, गॅरेज जळून खाक; दोन अग्निशमन जवान जखमी, प्रशासनाचा कठोर निर्णय
मुंबई प्रतिनिधी
दिवाळीचा आनंद साजरा करताना फटाक्यांच्या आतषबाजीने मुंबईकरांच्या सुरक्षिततेलाच मोठा धोका निर्माण केला आहे. दिवाळीच्या रात्री मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आगीच्या घटनांनी अक्षरशः थैमान घातले. रविवारी (८ नोव्हेंबर) अवघ्या एका दिवसात मुंबई अग्निशमन दलाकडे आगीच्या तब्बल १४२ घटनांची नोंद झाली. त्यापैकी तब्बल १३७ घटना फटाक्यांमुळे घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आगीच्या या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाले असून, बचावकार्यादरम्यान दोन अग्निशमन जवानही जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने अखेर कठोर पाऊल उचलले असून, मुंबई महापालिका हद्दीत रॉकेट आणि आकाशात उडणाऱ्या सर्व प्रकारच्या फटाक्यांवर २५ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत पूर्ण बंदी घातली आहे.
मुंबई आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सोमवारी, ९ नोव्हेंबर रोजी हा आदेश जारी केला. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी हा आदेश पारित केला आहे. त्यानुसार ९ नोव्हेंबरपासून २५ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत ही बंदी लागू राहणार आहे. विशेष म्हणजे, ही बंदी केवळ सार्वजनिक ठिकाणांपुरती मर्यादित नसून खासगी इमारती, गच्ची, टेरेस, बाल्कनी, अंगण, पार्किंग आणि झोपडपट्टी परिसरालाही लागू असणार आहे.
एका दिवसात आगीच्या १४२ घटना; १३७ फटाक्यांमुळे!
मुंबईकर दिवाळीच्या उत्साहात फटाक्यांची आतषबाजी करत असताना दुसरीकडे अग्निशमन दलाला मात्र आगीच्या घटनांमुळे अक्षरशः धावपळ करावी लागली. रविवारी एका दिवसात १४२ आगीच्या घटनांची नोंद झाली. त्यापैकी १३७ आगी फटाक्यांमुळे लागल्याचे महापालिकेच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. म्हणजेच मुंबईत नोंदवण्यात आलेल्या आगींपैकी तब्बल ९६ टक्के घटना फटाक्यांशी संबंधित होत्या.
डोंगरीतील हाजी कासम चाळ परिसरात लागलेल्या भीषण आगीने परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीत अनेक झोपड्या आणि दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. त्याचबरोबर गॅरेज आणि व्यावसायिक इमारतीच्या काही भागांनाही आगीची झळ बसली. अग्निशमन दलाच्या जवानांना आग नियंत्रणात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. कुर्ला, मालाड, घाटकोपर आणि शहरातील अन्य भागांतही फटाक्यांमुळे आगीच्या घटना घडल्या.
यापूर्वी शनिवारीही अग्निशमन दलाकडे ५६ आगीच्या घटनांची नोंद झाली होती. अंधेरीतील लोखंडवाला परिसरातील इमारतीला लागलेल्या आगीत धुरामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे दिवाळीच्या दोन दिवसांतच मुंबईतील अग्निशमन यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला.
विशेष म्हणजे, यंदाच्या दिवाळीत एका दिवसातील फटाक्यांमुळे लागलेल्या आगींची संख्या मागील दोन वर्षांतील संपूर्ण दिवाळी कालावधीतील आकडेवारीपेक्षाही अधिक ठरली आहे. २०२४ मध्ये संपूर्ण दिवाळीत फटाक्यांमुळे ८० आगींची नोंद झाली होती, तर २०२५ मध्ये हा आकडा ११३ होता. यंदा मात्र एकाच दिवसात १३७ आगी लागल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
रॉकेटच्या ठिणग्यांमुळे इमारतींना धोका
मुंबईसारख्या प्रचंड लोकवस्तीच्या शहरात आकाशात उडणारे रॉकेट आणि तत्सम फटाके अत्यंत धोकादायक ठरू शकतात. रॉकेट आकाशात उडवल्यानंतर त्याचे जळते अवशेष इमारतींच्या गच्चीवर, बाल्कनीत, खिडक्यांमध्ये किंवा आसपासच्या ज्वलनशील वस्तूंवर पडण्याची शक्यता असते. कागद, कापड, प्लास्टिक, लाकूड आणि इतर ज्वलनशील साहित्याने आग वेगाने पसरू शकते.
मुंबईतील उंच इमारती, दाट झोपडपट्ट्या, अरुंद रस्ते आणि एकमेकांना लागून असलेल्या निवासी व व्यावसायिक इमारती लक्षात घेता अशा प्रकारच्या फटाक्यांमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संभाव्य जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी प्रशासनाने रॉकेटवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
नेमकी कुठे आणि कोणती बंदी?
महापालिकेच्या आदेशानुसार मुंबई महापालिका हद्दीतील सार्वजनिक आणि खासगी अशा दोन्ही प्रकारच्या जागांवर रॉकेट व आकाशात उडणाऱ्या फटाक्यांचा वापर करता येणार नाही. निवासी इमारती, गच्ची, टेरेस, बाल्कनी, अंगण, पार्किंगची ठिकाणे आणि झोपडपट्टी परिसर यांचाही या बंदीत समावेश आहे.
ही बंदी ९ नोव्हेंबरपासून २५ नोव्हेंबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. संबंधित पोलीस उपायुक्त, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मात्र, रॉकेट वगळता इतर पारंपरिक फटाक्यांवर सरसकट बंदी घालण्यात आलेली नाही. त्यांचा वापर प्रचलित कायदे, सक्षम प्राधिकरणांचे निर्देश आणि न्यायालयाच्या आदेशांच्या अधीन राहूनच करावा लागणार आहे. हा आदेश आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदींनुसार जारी करण्यात आला आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कायद्यानुसार कारवाई आणि कारावासाचीही तरतूद आहे.
महापौरांचेही नागरिकांना आवाहन
आगीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर ऋतु तावडे यांनीही नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. निवासी इमारतींच्या जवळ, रस्त्यांवर किंवा पादचारी मार्गांवर फटाके फोडणे टाळावे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही रॉकेट किंवा फटाके घरांमध्ये पडून आग लागण्याच्या घटनांमध्ये संबंधितांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
अग्निशमन दलाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
मुंबई अग्निशमन दलानेही नागरिकांसाठी विशेष खबरदारीच्या सूचना जारी केल्या आहेत. फटाके केवळ मोकळ्या जागेत आणि सुरक्षित अंतर राखून फोडावेत. इमारती, दुकाने, वाहने, पेट्रोल पंप, विद्युत रोहित्रे आणि विद्युत तारांच्या जवळ फटाके फोडू नयेत. लहान मुलांना फटाके फोडताना एकटे सोडू नये. जळलेला किंवा न फुटलेला फटाका पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न करू नये. गच्ची, बाल्कनी आणि खिडक्यांमध्ये कागद, कापड किंवा अन्य ज्वलनशील वस्तू ठेवू नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
आगीची घटना घडल्यास तातडीने अग्निशमन दलाच्या १०१ या क्रमांकावर किंवा मुंबई महापालिकेच्या १९१६ या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एकीकडे दिवाळीचा आनंद आणि उत्साह, तर दुसरीकडे फटाक्यांच्या निष्काळजी वापरामुळे निर्माण होणारा जीवितहानीचा धोका, असे चित्र मुंबईत निर्माण झाले आहे. एका दिवसात १३७ आगी लागल्यानंतर प्रशासनाला रॉकेटवर बंदी घालण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता दिवाळीचा उर्वरित उत्सव साजरा करताना नागरिकांनीही जबाबदारीचे भान ठेवणे गरजेचे आहे. कारण काही क्षणांच्या आतषबाजीसाठी एखाद्या कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, एवढीच अपेक्षा!


